Trimbakeshwar Rain Update | त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार

Trimbakeshwar Rain Update | यंत्रणेची भूस्खलन भीतीने गाळण; मंत्री गिरीश महाजन यांची मेटवस्तीकडे धाव
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdatePudhari
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

ढगफुटीच्या हाय अलर्टने सर्वत्र निर्माण झालेली घबराट मंगळवारच्या सूर्योदयासोबत संपली. मेटघर किल्लापैकी गंगाद्वार मेट आणि सुपलीची मेट येथील रहिवाशांना त्र्यंबकेश्वर शहरात स्थलांतरित करण्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची सोमवारी रात्री धावाधाव सुरू होती. सुमारे १५ वाहनांचा ताफा घेऊन भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत रात्रीच्या वेळेस सुपलीची मेट आणि गंगाद्वार मेट येथे त्यांनी भेट दिली.

Maharashtra Rain Update
BJP Raigad Development: पालीच्या विकासासाठी भाजपची आक्रमक मोर्चेबांधणी

तेथील ग्रामस्थांना दरड कोसळणे, भूस्खलन यांचा धोका निर्माण झाल्याचे सांगत त्यांना त्र्यंबकेश्वर शहरात निवाऱ्याला येण्याचे आवाहन केले. सोमवारी रात्री पावसाचा विशेष जोर नव्हता. तथापि प्रशासनाने हाय अलर्ट जाहीर केल्याने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते.

बाजरपेठही बंद राहिली. दुपारनंतर तुरळक प्रमाणात काही दुकानदारांनी व्यवहार सुरू करत नागरिकांची गैरसोय दूर केली. त्र्यंबकेश्वर मंदिर बंदबाबत कल्पना नसलले परराज्यातील भाविक येथे बंद दरवाजासमोर हात जोडताना आढळले. त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, कक्ष अधिकारी विजय जाधव, थोरात यांच्यासह नितीन शिंदे, भाऊराव सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज ठेवली होती.

सोमवारी रात्री मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक यांनी उघड्यावर झोपड्या बांधून राहणारे माळा विक्रेते यांची वाहनतळाच्या सुरक्षित जागेत निवाऱ्याची सोय केली. यासह शहरातील सर्व धोकादायक ठिकाणांना भेट देऊन माहिती घेतली व सुरक्षा उपाययोजनांची तजवीज केली.

भराव वाहिला, रस्त्यांची चाळण

मंगळवारी ग्रामीण भागात संततधार पावसाने ग्रामस्थांची कोंडी केली. पहिणे ते देवगाव रस्त्यावरील पर्यायी पुलाचा भराव वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग येथील पुलाचे काम करत असून, पाइप टाकून भराव करत येथे पर्यायी रस्ता तयार केला होता. मंगळवारी पहाटे पावसाने तो वाहून नेला आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला देवगाव - पहिणे रस्ता बंद झाला आहे. हरसूल परिसरातील रस्त्यांची चाळण झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक थांबवली होती. पिंपळदच्या किकवी नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी त्र्यंबकेश्वर-ब्राह्मणवाडे रस्ता बंद होता.

लक्ष देण्याची मागणी

ब्रह्मगिरीच्या पायथ्याला अहिल्या धरणाच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. यासह जागोजागी उत्खनन सुरू असते. शासन यंत्रणा याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दरड आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होतो. यामुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महसूल विभागाला उत्खनन थांबवण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत तसेच जमीन सपाटीकरण, डोंगर टेकड्या आणि नदी, नाले, ओहळ यांच्याबाबत छेडछाड होणार नाही याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Maharashtra Rain Update
भय इथले संपत नाही...

ढगफुटीचे संकट अद्याप कायम

ढगफुटीसदृश पावसाचे संकट टळलेले नसून, कमी दाबाचा पट्टा दक्षिणेला अहिल्यानगरकडे सरकला आहे. पश्चिमेकडील पट्टा पेठ, सुरगाण्याकडून बागलाणकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. आपत्ती निवारणासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तलाठी, ग्रामसेवक मुख्यालयी थांबतील याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करतानाच जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे आपत्ती निवारण प्रशासनाने अशी ठिकाणे ओळखत वेळीच ठोस प्रतिबंधात्मक कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, सततच्या पावसामुळे खडकावरील मातीचा स्तर कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यातून पाणी वाहण्याचा आवाज येत असेल, तर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अशा ठिकाणांची यादी केली आहे. आपापल्या भागातील अधिकाऱ्यांनी अशी ठिकाणे ओळखावीत. आवश्यकतेनुसार त्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे. पावसामुळे पुराचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत पोलिस, वन, जिल्हा परिषद, नगर परिषद यांच्या समन्वयाने पूर प्रतिबंधक नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news