नाशिक

नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा, दिंडोरी पोलिसांची कारवाई

गणेश सोनवणे

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात कॅफे शॉपच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा बनवून तरुण-तरुणींना वाम मार्गाला लावण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रसिद्ध करताच ग्रामीण भागातील कॅफे शॉपवर धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर दिंडोरी शहरातील कॅफे शॉपवर दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी धडक कारवाई केल्याने शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कॅफे शॉपमध्ये तरुण-तरुणींसाठी वेगळे केबिन तयार करत या कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महाविद्यालयाकडूनही तक्रारी येत होत्या. कॅफे शॉप म्हणून एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी आणि महाविद्यालयीन परिसरात दुकान उघडले जाते. त्यात पुढील एक मोकळा हॉल असतो. त्यात कोणताही अनुचित प्रकार होत नाही. परंतु आतील बाजूला किंवा वरच्या केबिनमध्ये एक स्वतंत्र रूम तयार केला जातो. त्यामध्ये प्रेमीयुगुलांना प्रवेश दिला जातो. या खोलीमध्ये प्रवेशासाठी प्रतितासाला पैसे आकारले जातात. मिनी लॉजिंग म्हणून या कॅफे शॉपकडे बघितले जाते. यामध्ये प्रेमीयुगुल जाऊन बसतात. तसेच महाविद्यालयीन तरुण सिगारेटसारखे अमली पदार्थांचे सेवन करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने पोलिस निरीक्षक ढोकणे यांनी स्वत: शहरातील कॉफी शॉपवर छापे टाकले असता जोकर कॉफी शॉप येथे एक जोडपे अश्लील वर्तन करताना मिळून आल्याने शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

कॅफे शॉपच्या नावाखाली तरुण-तरुणींना वाम मार्गाला लावणे हे त्यांच्या भविष्यासाठी घातक आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी विशेष मोहीम हाताळत कॅफे शॉपवर कारवाई केली. शहराकडून त्यांचे अभिनंदन करतो व अशी कारवाई कायम करतील, अशी अपेक्षा बाळगतो.

– माधवराव साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते

 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT