देवळा, विठेवाडी येथील शेतकरी अरुण निकम यांच्या फ्लावर व डाळिंब पिकात साचलेले पाणी Pudhari
नाशिक

Deola Rain : रस्त्याची उंची वाढली, पावसाचे पाणी थेट शेतात; फ्लॉवर व डाळिंब पिकांचे नुकसान

रस्त्याच्या उंचीमुळे पावसाचे पाणी शेतात शिरल्याने फ्लॉवर व डाळिंब पिकांचे नुकसान, शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Deola Taluka Pomegranate Cauliflower Crop Damage

देवळा : देवळा तालुक्यातील विठेवाडी–मटाणे रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली असून, योग्य पद्धतीने मोरी न टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतात शिरून फ्लॉवर व डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी अरुण निकम यांनी केला आहे. या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, नुकसानभरपाई द्यावी तसेच पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी तहसील प्रशासन व कृषी विभागाकडे केली आहे.

निकम यांनी संबंधित विभागाला निवेदन देत विठेवाडी–मटाणे रस्त्यावर त्यांच्या शेतालगत पूर्व–पश्चिम दिशेला योग्य ठिकाणी मोरी बांधून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठेवाडी येथील शेतकरी अरुण पोपट निकम यांनी गट क्रमांक १९० मध्ये फ्लॉवर तर गट क्रमांक १५१ मध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांच्या शेताच्या पूर्व बाजूस ग्रामपंचायतीच्या मालकीचा गट क्रमांक १२५ आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकतेच विठेवाडी–मटाणे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाने न वाहता थेट निकम यांच्या शेतात शिरत आहे. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून फ्लॉवर व डाळिंब पिकांचे गंभीर नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याबाबत ग्राम सडक योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. तसेच तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनाही नुकसानीची माहिती देऊनही अद्याप पंचनामा किंवा पाहणी झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी अरुण निकम यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT