

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक स्वच्छता आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कुंभक्षेत्रात ५६ हजार तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आठ हजारांहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात येणार आहे.
सिंहस्थादरम्यान साधुग्राम, घाट परिसर, पार्किंग, होल्डिंग एरिया, प्रमुख - रस्ते तसेच महामार्गालगत सुमारे ५६ हजार तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. यात्रेकरूंना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. घाट आणि प्रमुख ठिकाणी सात हजार कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी नऊ लाखांहून अधिक लाइनर बॅगचा वापर केला जाणार आहे.
या बॅग दिवसातून तीन वेळा बदलल्या जाणार आहेत. संपूर्ण कुंभक्षेत्रात झाडलोट, घाटांची स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची देखभाल करण्यासाठी आठ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी तैनात राहतील. या कामांवर माहिती व संपर्क तंत्रज्ञान आधारित प्रणालीद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. याशिवाय यात्रेकरूंसाठी घाटांवर दोन हजार वस्त्रपरिवर्तन कक्ष उभारण्याचे नियोजन आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी १०० हून अधिक अतिरिक्त कचरा वाहने, टिपर आणि कॉम्पॅक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे उभारली जाणार आहेत. घाटांवर कचरा साचू नये यासाठी तातडीच्या प्रतिसादासाठी विशेष पथकेही कार्यरत राहतील. सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनांपैकी एक असून, त्याची स्वच्छता ही आरोग्याबरोबरच श्रद्धेचाही विषय आहे. यात उच्च दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा आणि व्यवस्थापन उभारले जात असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.