ग्रामसभेला उपस्थित नसलेल्या सरपंच, उपसरपंच यांच्या वर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी बाबा सूर्यवंशी यांना देतांना गुंजाळ नगर ग्रामस्थ Pudhari
नाशिक

Nashik News | सरपंच-उपसरपंच ग्रामसभेला गैरहजर; संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेल्या कथित गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Deola Gunjalnagar Gram Panchayat Lockout

देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच आणि बहुतांश सदस्य गैरहजर राहिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना शुक्रवारी (दि. २१) घडली. ग्रामसभेला पदाधिकारी गैरहजर राहण्यामागील कारणांची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मेघा वाबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गुंजाळनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेला ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ग्रामसेवक आणि केवळ दोन सदस्यच उपस्थित होते. त्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या विविध समस्या मांडता आल्या नाहीत. तसेच समस्यांवर चर्चा करून त्यावर निर्णय घेण्याची संधीही मिळाली नाही.

ग्रामसभेचे आयोजन करूनही सरपंच व इतर पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने उपस्थित ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

गैरकारभाराच्या चौकशीची मागणी

ग्रामसभेचे आयोजन करणारे सरपंचच सभेला उपस्थित न राहिल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार आणि आर्थिक अफरातफर झाल्यामुळेच सरपंच व सदस्य ग्रामसभेपासून दूर राहिले असावेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेल्या कथित गैरकारभाराची चौकशी करावी. तसेच ग्रामसभेला गैरहजर राहिलेल्या संबंधित पदाधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक गटविकास अधिकारी बाबा सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य विनोद आहेर, निलेश गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, शैलेश गुंजाळ, सागर जाधव, जितेंद्र गुंजाळ, दीपक जाधव, विवेक गुंजाळ, सचिन गुंजाळ, गौरव गुंजाळ, गोरख गुंजाळ, अमोल गुंजाळ, विलास गुंजाळ, रोहन गुंजाळ, सूरज गुंजाळ, विकास माळी, दिगंबर पवार, प्रशांत देवरे, सौरभ जाधव, योगेश देवरे, भिकुबाई शिरसाठ, ललिता साबळे, विजया माळी, सूनम पगारे, बायटा लोखंडे, चंद्रकला साबळे, दुर्गेश गुंजाळ आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शुक्रवारी सकाळी १० वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सरपंच उपस्थित नसल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली. सरपंच उपस्थित राहणार नसल्याचा निरोप त्यांच्या पतीकडून मिळाल्याने मी ग्रामसभेला उपस्थित राहू शकले नाही.
- शीतल गुंजाळ, उपसरपंच, गुंजाळनगर
सरपंच यांच्या आदेशानुसार शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सरपंच शरद गायकवाड आणि उपसरपंच ग्रामसभेला उपस्थित नव्हते. त्याबाबत विचारणा केली असता ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले.
- राजेंद्र ठाकरे, ग्रामपंचायत अधिकारी, गुंजाळनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT