

नाशिक : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून मृतदेह इगतपुरीजवळील कसारा घाटात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखा युनिट-१ च्या तपासातून उघडकीस आला. या प्रकरणी महिलेसह चार संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले.
इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वसंत गोरखनाथ सातपुते (४०, रा. स्वराजनगर, पाथर्डी फाटा) हे दि. ५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार नाझीमखान पठाण व पोलिस उपनिरीक्षक मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता, वसंत यांचा खून त्यांची महिला साथीदार हसिना हबीब शेख (४४) आणि साहिल रफिक शहा (२३) यांच्या मदतीने केल्याचे समोर आले.
चौकशीत संशयितांनी दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ३ च्या सुमारास राहत्या घरी वसंत यांचा गळा चाकूने चिरून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह मोईन मुक्तार शहा (२४) व सरफराज अबरार सय्यद (२२) यांच्या मदतीने गोणीत भरून अर्टिगा वाहनातून कसारा घाटात नेऊन फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी जंगलात शोध घेत मृतदेह गोणीतून हस्तगत केला.
पोलिसांनी हसिना शेख, साहील शहा, मोईन शहा आणि सरफराज सय्यद यांना ताब्यात घेतले असून, इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.