नाशिक : जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरात २६६ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील दोघे दगावले आहेत. ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे असून यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. (The number of dengue patients in the district is increasing day by day. During the year, 266 dengue patients were reported)
गत वर्षभरात निफाड, नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, सिन्नर आदी भागांत डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झाली. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची कमतरता, जनजागृतीचा अभाव, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावणे, पाणी साचून राहणे, ठिकठिकाणी डबके, खड्ड्यांमध्ये पाणी साचणे आदी कारणांमुळे डेंग्यूचा धोका वाढला. जि.प.च्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट यावी, यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात ४८ डेंग्यूबाधित रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये १० ने वाढ नोंदविण्यात आली. जुलै २०२४ मध्ये 49, ऑगस्ट 2024मध्ये ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. मालेगावमध्ये वर्षभरात ७३ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. ऑक्टोबर महिन्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. वर्षारंभी पहिले चार महिने डेंग्यू रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र मे २०२४ पासून डेंग्यूचा आलेख उंचावत गेला. वर्षभरात इगतपुरी आणि दिंडोरीत डेंग्यूमुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात सध्या चिकुनगुनिया नियंत्रणात असून वर्षभरात तपासलेल्या ४२२ नमुन्यांपैकी १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ऑक्टोबर महिन्यात केवळ एक रुग्ण चिकनगुनियामुळे आजारी पडला.
डेंग्यू विषाणूजन्य आजार असून हा एडीस जातीच्या मादी डासामुळे होतो. हे डास सकाळी, सायंकाळी चावतात. डासांची उत्पत्ती होऊ न देणे हाच यावर उपाय आहे. यासाठी नियमित काळजी घेणे आवश्यक आहे.
पाण्याचा साठा असलेल्या टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात. घरातील पाणीसाठे झाकून ठेवावे. अडगळीचे साहित्य नष्ट करावे, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना मच्छरदाण्या वापराव्या. तापात अॅस्पिरीन, ब्रुफेन अशी औषधे टाळावी. सकाळ, सायंकाळ पूर्ण कपडे घालावेत, औषध फवारणी करावी, गप्पी मासे पाळावेत.
तालुका - रुग्णसंख्या
इगतपुरी -१२
त्र्यंबक -११
नाशिक -४५
पेठ -१०
दिंडोरी -४२
सुरगाणा -८
कळवण -७
देवळा -२
मालेगाव -१३
नांदगाव -१४
येवला -३
सिन्नर -२२
निफाड -५२
चांदवड -९
सटाणा -१६
एकूण - २६६