

नाशिक : आदिवासी भागासह जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील 5 वर्षे वयाखालील लहान मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमाण शून्यावर आणून बालमृत्यू टाळण्यासाठी 12 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सांस (सोशल अवेरनेस अॅण्ड अॅक्शन टू न्युट्रलाइज न्यूमोनिया Social Awareness and Action to Neutralise Pneumonia Successfully-SAANS) अर्थात न्यूमोनियाविरोधात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
आदिवासी बहुल त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात वर्षभरात 238 बालमृत्यू झाले असून, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकमध्ये घट, बागलाण, इगतपुरी, दिंडोरीत वाढ झाली आहे यामुळे प्रशासन चिंतेत आहे. मागील वर्षी न्यूमोनियाने 21 मृत्यू झाले होते. त्यात नऊने घट होऊन हे प्रमाण 12 वर आले आहे. यंदा कमी वजनाची 40, जंतुसंसर्ग 13, श्वास घेण्यास त्रास 25, जन्मत: व्यंग 12, इतर आजारांनी 18 बालके दगावली आहेत.
त्र्यंबक, सुरगाणा, पेठ या तालुक्यांतील गरोदर मातांना शोधत त्या ज्या ठिकाणी राहतात तेथील अंगणवाडी सेविका, आशा यांच्याकडून त्यांना आरोग्यसेवा घेण्यासाठी प्रवृत्त करायचे. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात वेळोवेळी तपासणी करणे, रक्ताची पातळी तपासणे, बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आणणे, विशेष उपचाराची गरज असल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करणे, तिला जननी-शिशू सुरक्षा, जननी सुरक्षा, मानव विकास अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सांस मोहिमेमध्ये करण्यात आला आहे. बाळावर उपचारासाठी आशा सेविकांना प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून बाळाला प्राथमिक उपचार मिळतील.