

नाशिक : शहरात पावसाळा सरल्यानंतरही डेंग्यूचा उद्रेक कायम आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे १०७ नवे बाधित आढळल्याने एकूण डेंग्यूबाधितांचा आकडा आता १,०७९ वर पोहोचला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत डेंग्यू रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात महापालिकेच्या वैद्यकीय प्रशासनास यश आलेले नाही.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये १,०७९ डेंग्यूबाधित आढळल्याची नोंद महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे असली, तरी प्रत्यक्षात या आजाराची लागण झालेल्यांची संख्या याहून कितीतरी पटीने अधिक आहेत. उपचाराअंती हे रुग्ण बरे झाले आहेत. ज्या रुग्णांचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेला, त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रशासनाकडून अद्यापही अस्पष्टता आहे. त्यामुळे या आजाराची तीव्रता प्रशासनाकडून लपविली जात असल्याच्या संशयाला बळकटी आली आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासांची पैदास साधारणत: आठ दिवस साचलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत गेला. मे महिन्यात या आजाराचे ३३ रुग्ण आढळले होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराची तीव्रता वाढत गेली. जून महिन्यात १६५, जुलैत ३६०, ऑगस्टमध्ये १९८, सप्टेंबर महिन्यात १९८, तर ऑक्टोबरमध्ये १०७ डेंग्यू बाधित आढळून आले. आतापर्यंत डेंग्यू रुग्णसंख्येचा एकूण आकडा १,०७९ वर पोहोचला आहे. २०२२ मध्ये ६७७ डेंगू बाधित आढळले होते. २०२३ मध्ये १,२९४ तर यावर्षी 10 महिन्यांत १,०७९ रुग्ण आढळले आहेत.
शहरात डेंग्यूपाठोपाठ चिकुनगुनियाचाही प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात चिकुगनुनियाचे पाच नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी फेब्रुवारीत ४, मार्चमध्ये 3, एप्रिल 6, जून ११, जुलै १४ तर ऑगस्ट मध्ये दोन रुग्ण आढळले होते. जानेवारी, मे, सप्टेंबर महिन्यात चिकनगुनियाचा रुग्ण आढळला नाही. जानेवारी ते ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण ४५ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले.