नाशिक : जिल्ह्यात 1 जुलैपावेतो सरासरी 222.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 127.5 टक्के आहे. मालेगाव वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली.
जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळाली. जिल्ह्याचे जूनचे सरासरी पर्जन्यमान 222.4 मिलिमीटर आहे. मात्र, यंदा 1 जुलैपावेतो नाशिक तालुक्यात 257.9 मिलिमीटर पाऊस झाला. 2024 मध्ये याच कालावधीत सरासरी 103.4 मिलिमीटर पर्जन्य म्हणजे 64.2 टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.
जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक 662 मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्याच्या जूनच्या तुलनेत हे प्रमाण 208 टक्के आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत 458 मिलिमीटर (92.5 टक्के) पाऊस झाला. नाशिक तालुक्याचे पर्जन्यमान 153 मिलिमीटर असताना आजपर्यंत 257 मिलिमीटर नोंद झाली असून, सरासरीच्या 167 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी 90.8 मिलिमीटर पाऊस मालेगावमध्ये नोंदविला गेला असून, हे प्रमाण केवळ 85.6 टक्के आहे. दरम्यान, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
मालेगाव 90.8, बागलाण 131.5,कळवण 174.4, नांदगाव 106,सुरगाणा 370,नाशिक 257.9, दिडोरी 279.9, इगतपुरी 458.4, पेठ 496.6, निफाड 182.7, सिन्नर 164, येवला 155, चांदवड 178.8, त्र्यंबकेश्वर 662.5, देवळा 101.
नाशिक शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. शहरात 1 जून ते 1 जुलै या काळात 257.9 मिलिमीटर पावसाची नोंद मेरी येथील हवामान विभागात करण्यात आली मेमध्ये 187 मिलिमीटर पाऊस झाला होता. शहरात यापूर्वी 2017 मध्ये जूनमध्ये सर्वाधिक 2494 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला होता. चालू वर्षी या पावसाने हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
आठ दिवसांपासून गंगापूर, दारणा व पालखेड समूहातील धरणांमधून नांदरमध्यमेश्वरमार्गे करण्यात आलेल्या विसर्गातून पाणी वेगाने मराठवाड्याकडे झेपावते आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत 8 हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच 8 टीएमसी पाणी जायकवाडीला पोहोचले आहे.