pudhari1
नाशिक

Nashik Cyber Police | "सायबर पोलिसांची तत्परता! नाशिकमध्ये 90 लाखांची ऑनलाईन फसवणूक रोखली"

Nashik Cyber Police | सायबर पोलिसांनी रोखली ९० लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मायक्रोसॉफ्ट टीम्सवर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे (सीईओ) बनावट प्रोफाइल तयार करून तब्बल ९६ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांनी केला. मात्र, कंपनीच्या सतर्कतेसह नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यापैकी सुमारे ९० लाख रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोड परिसरातील रेस सॉफ्टवेअर अँड एज्युकेशन टेक्नॉलॉजीचे संचालक सुरेशचंद्र मल्होत्रा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २२ जुलै रोजी कंपनीचे संचालक मल्होत्रा हे अमेरिकेत असताना संशयिताने त्यांच्या नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर हुबेहूब बनावट आयडी तयार केला.

त्यानंतर कंपनीच्या अकाऊंट्स हेड अंजली मुळे यांच्याशी संपर्क साधून आपण महत्त्वाच्या सरकारी बैठकीत असल्याचे सांगत तातडीने ९६ लाख रुपये आरटीजीएसद्वारे कोटक महिंद्रा बँकेच्या उडुपी शाखेतील एका खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश दिले.

सीईओंचे आदेश असल्याचा समज झाल्याने रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र, व्यवहारानंतर संशय आल्याने अंजली मुळे यांनी राहुल मल्होत्रा यांच्या मूळ व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून व्यवहार गोठविण्याची विनंती केली.

त्याचवेळी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत बँकांशी समन्वय साधला. त्यामुळे ९६ लाखांपैकी सुमारे ९० लाख रुपये सुरक्षित करण्यात यश आले. या प्रकरणाचा आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय धागेदोरे लक्षात घेऊन सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT