

आलोख मोडक
पैंगिण : काही वाढदिवस केवळ शुभेच्छांनी साजरे होतात; काही केक कापून संपतात. पण काही वाढदिवस असे असतात, जे एखाद्याच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करून आशेचा दिवा प्रज्वलित करतात. मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमधाम संकल्पनेंतर्गत शोभा बाबली पागी यांच्या हाती नव्या घराची चावी सुपूर्द होणार आहे. हा केवळ एका घराचा ताबा नाही, तर एका संघर्षमय आयुष्याला मिळालेला स्वाभिमानाचा आधार आहे.
शोभा बाबली पागी... वयाच्या अवघ्या काही वर्षांतच वडिलांचे छत्र हरपले. जन्म पाळोळे येथे झाला; परंतु दत्तक घेतलेल्या आई-वडिलांच्या आश्रयात वाढू लागल्या. नियतीने मात्र त्यांच्यावर पुन्हा घाला घातला. बालपणीच दत्तक वडिलांचे निधन झाले आणि पंचविसाव्या वर्षी आईही कायमची सोडून गेली. त्यानंतर त्यांच्यासोबत राहिली ती फक्त वृद्ध आजीची आठवण, एक मोडकळीस आलेले घर आणि एकाकी आयुष्य. मे २०२५… पहाटेचा तो क्षण आजही अंगावर काटा आणणारा आहे. सकाळी सातच्या सुमारास मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अचानक आलेले वादळ… घरासमोरील विशाल फणसाचे झाड क्षणार्धात घरावर कोसळले. त्यावेळी शोभाताई घराची साफसफाई करत होत्या. झाडाच्या तडाख्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जीव वाचला, पण झोपडी क्षणार्धात उद्ध्वस्त झाली.त्या भग्न घराकडे पाहून डोळे पाणावले. पण त्या अश्रूंमध्येही आशेचा किरण होता. स्थानिक उपसरपंच सुनील पैगीणकर यांनी ही वेदनादायक घटना सरपंच सविता तवडकर आणि ‘श्रमधाम’ संकल्पनेचे अध्वर्यू मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. क्षणाचाही विलंब न करता डॉ. तवडकर स्वतः त्या ठिकाणी पोहोचले.