Goa Theatre Artist Leena Naik Desai | रंगभूमीवर दमदार ठसा उमटवणारी अभिनेत्री : लीना नाईक-देसाई

Goa Theatre Artist Leena Naik Desai | गोव्याची भूमी म्हणजे कला, संस्कृती आणि लोकपरंपरांचा समृद्ध संगम. या परंपरेला आजही जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनेक महिला नाट्य कलाकार करत आहेत.
Goa Theatre Artist Leena Naik Desai
Goa Theatre Artist Leena Naik Desai
Published on
Updated on

रंगयात्रा : निवृत्ती शिरोडकर

गोव्याची भूमी म्हणजे कला, संस्कृती आणि लोकपरंपरांचा समृद्ध संगम. या परंपरेला आजही जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनेक महिला नाट्य कलाकार करत आहेत. घर, संसार, नोकरी आणि रंगमंच यांचा समतोल साधत त्या केवळ अभिनय करत नाहीत, तर समाजप्रबोधनाचे मोठे कार्यही पार पाडतात. अशाच समर्पित आणि मेहनती अभिनेत्रींपैकी एक म्हणजे लीना रामा नाईक-देसाई होय.

Goa Theatre Artist Leena Naik Desai
Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

गोमंतकीय रंगभूमीवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने, प्रभावी रंगमंचीय उपस्थितीने आणि शिस्तबद्ध कलाप्रवासाने लीना यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ३ ऑगस्ट १९९१ रोजी बेतकी येथे जन्मलेल्या लीना यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची विशेष आवड होती. बालपणापासून जोपासलेली ही आवड पुढे त्यांची ओळख बनली.

रंगभूमीवरील यशामागे त्यांची मेहनत, सातत्य आणि कलेप्रती असलेली निष्ठा हेच खरे बळ ठरले. त्यांनी आजवर 'रुपयो असल्यार दी', 'आवय गे देवा', 'सुशेगाद गोंयकारा', 'चुकान मिस्टेक', 'मनी मनी पैसे पैसे', 'भय्या माजो सुपरस्टार', 'अरे रामा आणि एक फॅमिली फूल झालेली' अशा गाजलेल्या कोकणी नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या नाटकांचे मिळून त्यांनी राज्यभरात ४०० हून अधिक प्रयोग केले असून, प्रत्येक प्रयोगात त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

रंगभूमीवरील कलाकारांचे आयुष्य बाहेरून जितके आकर्षक दिसते, तितके ते प्रत्यक्षात सोपे नसते. सकाळी नियमित नोकरी, त्यानंतर घरातील जबाबदाऱ्या, कुटुंबाची काळजी आणि रात्री उशिरापर्यंत तालमी या सर्वांचा समतोल साधताना कलाकाराला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लीना याही त्याला अपवाद नाहीत. प्रयोग अनेकदा मध्यरात्रीपर्यंत चालतात. तरीही दुसऱ्या दिवशी त्या वेळेवर नोकरीवर हजर राहतात. कामात कोणतीही तडजोड न करता शिस्तबद्ध जीवन जगण्याची त्यांची सवय आजच्या पिढीसाठी आदर्श ठरते.

लीना यांच्या मते नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे माध्यम आहे. व्यसनमुक्ती, स्त्रीशिक्षण, पर्यावरण संवर्धन, भ्रष्टाचार, सामाजिक जबाबदारी अशा अनेक विषयांवर नाटकातून प्रभावीपणे भाष्य करता येते. भूमिका करताना केवळ संवाद म्हणणे पुरेसे नसते, तर त्या पात्राच्या भावविश्वात शिरून त्याचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते.

प्रत्येक यशस्वी कलाकारामागे त्याला योग्य दिशा दाखवणारे गुरू असतात. लीना यांनाही अनेक ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले. सुनील नाईक, नीतेश नाईक, गौरेश खेडेकर आणि प्रेमानंद गुरव यांना त्या आपल्या प्रेरणास्थानी मानतात. या सर्वांच्या सहवासातून अभिनयातील बारकावे, रंगमंचावरील वावर, संवादफेक, प्रसंगातील भावनिक संतुलन आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची कला त्यांनी आत्मसात केली.

अभिनयाइतकाच नृत्य हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दांडिया आणि विविध प्रकारच्या नृत्याविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होतात. अभिनय क्षेत्रात आल्या नसत्या तर नृत्यांगना म्हणून वेगळी ओळख निर्माण केली असती, असे त्या हसत सांगतात. त्यांच्या मते अभिनय आणि नृत्य या दोन्ही कला एकमेकांना पूरक आहेत. नृत्यामुळे शरीरभाषा प्रभावी होते आणि अभिनय अधिक नैसर्गिक वाटतो.

लीना नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. एखाद्या संस्थेला दर्जेदार नाटक सादर करायचे असल्यास त्या तालमीसाठी वेळ देतात. संवादफेक, रंगमंचावरील हालचाली, मेकअप, देहबोली आणि आत्मविश्वास याबाबत त्या नवोदितांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते टीव्ही आणि मोबाईलच्या युगातही रंगभूमी टिकून राहण्यासाठी नव्या पिढीने नाटकाकडे वळणे आवश्यक आहे.

भूमिकेचा अभ्यास करा

रंगभूमी ही कलाकाराला घडवणारी संस्कारशाळा आहे. या क्षेत्रात संघर्ष अटळ आहे; मात्र जिद्द, शिस्त, सातत्य आणि कलेवरील निष्ठा असेल, तर यश निश्चित मिळते. अडचणींना घाबरू नका, प्रत्येक भूमिकेचा मनापासून अभ्यास करा आणि रंगदेवतेचा सन्मान राखा. कलाकारासाठी सर्वात मोठे पारितोषिक म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या, त्यांचे प्रेम असते, असेही लीना नाईक-देसाई सांगतात.

Goa Theatre Artist Leena Naik Desai
Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

यशस्वी कलाकार घडवण्यात कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे त्या सांगतात. आई-वडील, पती आणि संपूर्ण कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच घर, संसार, नोकरी आणि रंगभूमी यांचा समतोल साधता आला. कलेचा वारसा पुढच्या पिढीकडे जावा, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. मात्र मुलांवर कोणतीही कला लादू नये, त्यांच्या आवडीनुसार त्यांना संधी द्यावी, असे त्या आवर्जून सांगतात.

कलाक्षेत्रातील संघर्षाविषयी बोलताना त्या सांगतात की कलाकाराचे वैयक्तिक आयुष्य आणि रंगमंचावरील जबाबदारी वेगळी असते. एकदा त्यांच्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते, तरीही त्यांनी प्रयोग पूर्ण केला. सहकलाकारांनी दिलेल्या साथीतून तो प्रयोग यशस्वी झाला.

कोरोना काळ कलाकारांसाठी अत्यंत कठीण होता. अनेक कलाकार आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले. अशा वेळी लक्ष्मी नारायण नाट्यमंडळ आणि आरती यांनी वेळोवेळी कामाची संधी दिली. पहिल्यांदा रंगमंचावर उभे राहताना प्रचंड भीती वाटत होती. रंगभूमीप्रमाणेच चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली, तर ती आनंदाने स्वीकारण्याची तयारी असल्याचे लीना सांगतात. लीना रामा नाईक-देसाई या केवळ अभिनेत्री नाहीत तर त्या मार्गदर्शक, संस्कृतीच्या जतनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या गुरू आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news