नाशिक

Nashik Crime Update | नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांच्याविरोधात सातत्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असून, नाशिक रोड पोलिस ठाण्यात आणखी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारडा यांनी बांधकाम पूर्ण न करता तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता, ग्राहकांची सुमारे पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फिर्यादी विनोद विजय गाडेकर (रा. विपुल सिद्धी निवास, जुना चेहेडी रोड, नाशिक रोड) व इतर फ्लॅट खरेदीधारकांनी संचालक नरेश जुगमल कारडा (४६, रा. साईकृपा कॉम्प्लेक्स, टिळक रोड, नाशिक रोड व प्रवीण मुरलीधर जगताप (४०, रा. सायट्रिक, पंचक, जेलरोड) यांच्या कारडा कन्स्ट्रक्शनतर्फे सुरू असलेल्या खर्जुल मळा येथे हरी संस्कृती या इमारतीत फ्लॅट्सचे बुकिंग केले होते. त्यावेळी संशयित कारडा व जगताप यांनी संगनमताने फ्लॅट खरेदीधारकांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता, फ्लॅट खरेदीधारकांकडून वेळोवेळी एक कोटी २५ लाख २७ हजार ८१ रुपयांची रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सन २०१९ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित कारडा व जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यात गणेश विनायक कपोते (रा. खोडदेनगर, उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी कारडा कन्स्ट्रक्शन्स व कारडा इन्फ्रास्ट्रक्चरचे नरेश जुगमल कारडा व कंपनीच्या इतर भागीदारांनी नियोजित मिळकत हरी गोकुळधाम, पंचक, नाशिकरोड येथील घराच्या खरेदीकरिता ९ लाख ३९ हजार रुपये फिर्यादी कपोते यांच्याकडून स्वीकारले होते. तसेच विनोद अशोक जाधव यांच्याकडून ११ लाख ९४ हजार २३ रुपये, प्रफुल्ल भालेराव यांच्याकडून १३ लाख ५० हजार, विश्वनाथ चव्हाण यांच्याकडून १३ लाख ७४ हजार ८७८ रुपये अशी एकुण ४८ लाख ५७ हजार ९०१ रुपये स्वीकारून आजपर्यंत या इमारतीचे कोणतेच बांधकाम पूर्ण न करता, फ्लॅटधारकांना मुदतीत ताबा न देता फसवणूक केली आहे. या प्रकरणी नरेश कारडा व कंपनीच्या इतर भागीदारांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT