देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्प : कोयता गँगने तोडफोड केलेली वाहने. (छाया : सुधाकर गोडसे)
नाशिक

Nashik Crime News | कोयता गॅंग आठ दिवसांपासून मोकाट

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : हाडोळा परिसरात गेल्या 15 दिवसांत दोन वेळा कोयता गॅंगकडून दहशत निर्माण करीत बारा गाड्यांची तोडफोड करताना महामानव डॉ. बाबासाहेबांची प्रतिमादेखील फोडण्यात आली. त्यामुळे आंबेडकरी जनता संतप्त झाली असून, पोलिसांकडे तक्रार करून आठ दिवस उलटले, तरी अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येत्या 20 जुलै रोजी रिपाइंच्या वतीने पोलिस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा रिपाइं आठवले गटाचे प्रदेश सचिव डॉ. संतोष कटारे व शहराध्यक्ष सुरेश निकम यांनी दिला आहे.

देवळाली शहरात 15 दिवसांत दोनदा हाडोळा परिसरात गुंडांकडून दहशत निर्माण होऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 25 जूनला दोन गटांतील हाणामारीत एका गटाने थेट हाडोळा परिसरात दहशत पसरवत येथील नागरिकांना धमकावले. हातात कोयता, चॉपर, काठ्या घेऊन आल्यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळेस पोलिसांकडे तक्रारदेखील करण्यात आली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

परिणामी 8 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा हाडोळा परिसरात दहशत निर्माण करीत 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. याबाबत परिसरातील नागरिकांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नंतर पोलिसांनी येथील नागरिकांची बैठक घेत या घटनेतील संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच दररोज दोन पोलिसांचा जागता पहारा राहणार असल्याचे सांगितले होते.

येत्या 20 जुलैपर्यंत पोलिसांनी या घटनेतील सहभागी लोकांना अटक केली नाही, तर रिपाइंचे राज्य सचिव डॉ. संतोष कटारे व शहराध्यक्ष सुरेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिवराज मोरे, कुंदन दोंदे, वत्सला रणशेवरे, रोहिणी कांबळे, रेना शेख आदींनी दिला आहे.

सीसीटीव्हीसाठी अर्थसाहाय्य

सीसीटीव्हीसाठी येथील डॉ. संतोष कटारे यांनी पोलिसांना अर्थसाहाय्यदेखील केलेले आहे मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. गेल्या आठ दिवसांपासून येथील नागरिक सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपूर्वी येथील 100 हून अधिक महिलांनी एकत्र येत आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना या परिसरात अशा प्रकारचा हल्ला आजपर्यंत कोणीही केलेला नाही. परंतु पोलिसांचा वचक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढून या मागासवर्गीय वस्तीवर हल्ले होऊ लागले आहेत. या वस्तीवर पुन्हा मोठा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागासवर्गीय भागात पहिल्यांदा कोयता गॅंगकडून हल्ला झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही निवेदनाद्वारे माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आ. सरोज अहिरे या पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत.
डॉ. संतोष कटारे, राज्य सचिव, रिपाइं, नाशिक.
SCROLL FOR NEXT