Deolali
देवळाली पोलीस (छाया : सुधाकर गोडसे)

Nashik News | देवळालीत कोयत्याची दहशत, 'मिशन ऑल आउट' ची गरज

देवळाली : मिशन ऑल आउट', कोंबिंगचा धडाका सुरू

देवळाली कॅम्प: नाशिकचे नवे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीत मिशन ऑल आउट' व कोंबिंगचा धडाका सुरू करत गुन्हेगारांना इशारा दिला असला तरी कोयता गॅंगने परिसरात दहशत निर्माण केली आहे. कोयता गॅंगच्या मुस्क्या आवळण्याची मोहीम देवळाली कॅम्प पोलीस ठाणे परिसरात ही मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत भगूर, देवळाली ही दोन शहरे तसेच राहुरी, दोनवाडे, लोहशिंगवे, वंजारवाडी, लहवीत, संसरी, नानेगाव, शिगवे बहुला हा ग्रामीण भाग येतो. परंतु दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या लक्षात घेता अस्तित्वात असलेले पोलीस बळ कमी पडत आहे. हे बळ वाढणे अपेक्षित होते. मात्र गेल्या 30 वर्षापासून पोलिसांच्या संख्येत कोणतीही वाढ येथे झालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी देखील दाखल होत नाहीत. सामाजिक कलह कमी असला तरी भूरट्या चोऱ्या व हाणामारांचे प्रकार वाढले आहेत. मागील आठवड्यात अल्पवयीन मुलांकडून कोयते, दांडे यांनी हल्ला करण्यात आला. या युवकांची मजल थेट घरापर्यंत पोहोचली असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलीस आयुक्तालयाकडून दोन वर्षांपूर्वी मिशन ऑल आउट व कोंबिंग ऑपरेशन या मोहिमा राबवताना अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. दुचाकीचोर, चेन स्केचिंग करणारे पोलिसांच्या हाती लागले होते. नाशिक शहर व परिसरातील अनेक गुन्हेगार वास्तव्यासाठी देवळाली कॅम्प परिसरात येत असून येथील शांततेला धोका निर्माण झाला आहे. मुंबईस्थित अनेक गुन्हेगार या ठिकाणी वास्तव्यास असतात हे शोध मोहिमेत वेळोवेळी आढळून आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आत्तापासूनच गुन्हेगारी हटाव ही मोहीम राबविणे गरजेचे आहे. शांतता समितीच्या बैठकीत अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी देवळाली कॅम्प पोलिसांचे पोलीस बळ वाढवण्यासह भगूर पोलीस स्टेशनच्या निर्मितीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केलेला आहे. नव्या पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतल्यास लष्करालगतच्या या शहरात गुंडगिरीचा लवलेशही राहणार नाही.

logo
Pudhari News
pudhari.news