नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोने 'एअरोनॉमिक्स २०२५' या नावीन्यपूर्ण मोहिमेची गुरुवारी (दि. ३१) औपचारिक घोषणा केली आहे. 'स्वच्छ हवा, शून्य कचरा आणि सशक्त नाशिक'साठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मोहिमेसाठी क्रेडाईने शहरातील तब्बल १८ संघटनांची एकजूट केली आहे. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १) सायंकाळी ५ वाजता पालम स्प्रिंग येथे या मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, सत्यजित तांबे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांचीदेखील विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी नाशिक शहराच्या हवेची गुणवत्ता आणि अर्थकारण यावर आणि कचरा नियोजनाबाबतच्या दोन श्वेतपत्रिका पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना सादर केल्या जाणार आहेत. यावेळी दोन चर्चासत्रांचेही आयाेजन केले जाणार असून, त्यामध्ये महापालिका मनीषा खत्री आणि एमपीसीबीचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांच्याकडून शहराच्या हवेच्या गुणवत्तेबाबतची विस्तृत माहिती जाणून घेतली जाणार आहे. तसेच मोहिमेत सहभागी सर्व संस्थांकडून पर्यावरण साक्षरतेची शपथ घेतली जाणार आहे.
मोहिमेची रूपरेषा स्पष्ट करताना गौरव ठक्कर म्हणाले की, शहराचा विकास झपाट्याने होत असताना, प्रदूषणमुक्त व पर्यावरणस्नेही शहर घडवण्याची जबाबदारी वाढली आहे. 'एअरोनॉमिक्स २०२५' ही केवळ पर्यावरण रक्षणाची नव्हे, तर नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक उत्कर्षाची चळवळ आहे. स्वच्छ हवा आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापनावर आधारित ही मोहीम शहराला जागतिक दर्जा प्राप्त करून देऊ शकते.
मोहिमेचे समन्वयक तथा क्रेडाई नाशिक मेेट्रोचे उपाध्यक्ष उदय घुगे म्हणाले की, २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक स्वच्छ, पर्याावरणस्नेही व आकर्षक करणे ही गरज आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पर्यटकांना चांगले शहर अनुभवावयास मिळेल. त्याचा थेट परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर होईल. मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले की, बांधकाम व्यावसायिक हे केवळ इमारती उभ्या करणारे नाहीत, तर शहर घडवणारे शिल्पकार असतात. 'एअरोनॉमिक्स २०२५' सारख्या उपक्रमांमधून आमचा समाजाप्रति असलेला सहभाग व्यक्त होतो. नाशिकच्या शाश्वत विकासासाठी सर्व सामाजिक संस्था, उद्योगसमूह आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही मोहीम जनआंदोलनात रूपांतरित करावी. यावेळी निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बुब, नरेडको अध्यक्ष सुनील गवादे, आयएमए अध्यक्ष डॉ. नीलेश निकम, कृणाल पाटील, मनीष रावल आदी उपस्थित होते.
नाशिक सिटिझन फोरम, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नाईस, निमा, आयमा, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, नरेडको, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक, आर्किटेक्ट आणि इंजीजिअरिंग असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक आयटी असोसिएशन, लघुउद्योग भारती, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, फायर सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया आदी.
हवेचा दर्जा सुधारणा, स्वच्छ इंधनावर आधारित वाहतूक, औद्योगिक प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवणे, कचरा व्यवस्थापन, सुटका, रिसायकलिंग व कम्पोस्टिंग, जनजागृती आणि लोकसहभाग, सिंहस्थ-कुंभमेळा २०२७ जागतिक संधीचा लाभ आदी.