

नाशिक : छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भुजबळ फार्मवर हजेरी लावत असून, शनिवारी (दि. १४) क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले.
भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित झाले होते. मात्र, त्यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे शहरातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाता आले नाही. दरम्यान, शनिवारी (दि.१४) मंत्री भुजबळ नाशिकमध्ये आल्याने, विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भुजबळ फार्मवर गर्दी केली होती. यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, सचिव तुषार संकलेचा यांच्यासह नूतन कार्यकारिणींनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. नाशिकमध्ये 300 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी काही बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.