Simhastha Kumbh Mela Nashi Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थाच्या संथ कामांवरून महापालिका आयुक्त आक्रमक; अधिकारी आणि ठेकेदारांची घेतली झाडाझडती

Simhastha Kumbh Mela | अधिकारी-ठेकेदारांची झाडाझडती; गोदाघाटाची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

चौधरी, भदानेंवर जबाबदारी

या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कामांचे सहनियंत्रण अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर, अतिरिक्त आयुक्त नीलेश मडाणे यांच्यावर 'एनटीकेएमई', गोदा आरती समिती आणि रोहित संघ यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित संस्था आणि संघटनांशी चर्चा करून कार्यक्रमाच्या तयारीसाठी आवश्यक नियोजन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, सिंहस्थाच्या संथ कामावरून आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि. १२) पंचवटीतील स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेत अधिकारी, ठेकेदारांची चांगलीच झाडाझडती घेतली. बैठकीनंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह गोदाघाटाची पाहणी करत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या अल्टिमेटम दिला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या तयारीसाठी नाशिक महापालिका प्रशासनाने कामांना वेग दिला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होलकर पूल ते रोकडोबा पटांगण परिसरातील विविध विकासकामे आणि मूलभूत सुविधांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित विभागांना दिले.

कार्यक्रमास्थळ आणि परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन व विल्हेवाट, अनधिकृत अतिक्रमणे हटविणे, रस्त्यांची दुरुस्ती, सार्वजनिक जागांची स्वच्छता, पथदिव्यांची देखभाल आणि मलनिस्सारण व्यवस्थेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारीही संबंधित विभागांवर सोपविण्यात आली आहे.

शासकीय कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच कामांच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवावी, अशा सूचनाही आयुक्त खत्री यांनी दिल्या. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न केल्यास किंवा कामात दिंगाई व कुचराई झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कार्रवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

सिंहस्थासाठी १०० रुग्णवाहिकांची व्यवस्था

सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून २५ रुग्णवाहिकांची खरेदी करणार असून, महापालिका प्रशासनाकडून ७५ रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दर मागवले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात कोट्यवधी भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. सिंहस्थातील आरोग्य व्यवस्थेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्राधिकरणाकडे रुग्णवाहिकांची मागणी केली होती. त्यानुसार २५ रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय घेतला आहे.

रुग्णालयामधील खाटांची क्षमता वाढविण्याचे नियोजनही केले आहे. तपोवन येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून, बिटको रुग्णालयासह पंचवटी आणि इंदिरानगर परिसरातही अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. सिंहस्थात तीन अमृतस्नान होणार असल्याने या काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरत्या दवाखान्यांसह रुग्णवाहिकांची पुरेशी व्यवस्था ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT