नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक मनपाचं 2 हजार कोटींचं बजेट सज्ज! खेड्यांच्या विकासासाठी तिजोरीचा दरवाजा होणार खुला

Nashik Municipal Corporation | स्थायी सभापती मच्छिंद्र सानप : शासनाकडे निधीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पुढील आठवड्यात स्थायी समितीमार्फत महासभेला सादर केले जाणार आहे. नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा यात समावेश केला जाणार असून, विशेषतः खेडे विकास निधीसाठी तरतूद केली जाणार आहे.

निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिली आहे.

नाशिक महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे ३,०११ कोटींचे प्रारूप अंदाजपत्रक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीमार्फत या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असून, पुढील आठवड्यात स्थायी समितीने शिफारस केलेले अंदाजपत्रक महासभेच्या अंतिम मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.

आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात सुमारे ४०० ते ५०० कोटींची वाढ स्थायी समितीमार्फत केली जाणार असून, प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांच्या विकासनिधीत या अंदाजपत्रकात भरीव वाढ अपेक्षित आहे.

नाशिक महापालिका स्थापनेला ४४ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी स्थापनेवेळी महापालिका हद्दीत समावेश झालेल्या २३ खेड्यांचा विकास मात्र झालेला नाही. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या या खेड्यांचा ग्रामीण बाज आजही कायम असून रस्ते, पाणी, गटारे यांसारख्या मूलभूतसुविधांसाठी या भागातील नागरिकांना झगडावे लागत आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात नगरसेवकांनी आक्षेप नोंदविल्यानंतर सभापती सानप यांनी खेडे विकास निधीसाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील रस्ते, पथदीप या सुविधांसाठी खर्चाची स्वतंत्र तरतूद राहणार आहे.

महापालिका हद्दीतील खेड्यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खेडे विकास निधीकरिता अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे प्रशासकीय राजवटीतील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठीही नगरसेवकांसाठी वाढीव तरतूद केली जाणार आहे.
- मच्छिंद्र सानप, सभापती, स्थायी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT