नाशिक: पुढारी वृत्तसेवा
गोवर्धन शिवारात भरधाव इनोव्हा वाहन चालवत एकाचा बळी घेणाऱ्या मद्यपीचालकाचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या हवालदारास निलंबित करण्यात - आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ. सीमा हिरे यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली.
काही महिन्यांपूर्वी कमलेशकुमार वर्मा ही व्यक्ती केटरिंगचे काम संपवून घरी जाण्यासाठी सुला वाइन ते गोवर्धन रोडवरील पामस्प्रिंग हॉटेलच्या समोर उभा होता. या दरम्यान भरधाव आलेल्या इनोव्हा कारने वर्मा यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी यश सतीश खैरनार या मद्यपीचालकास अटक केली होती. परंतु तपासणीसाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यास हवालदार दीपक पाटील यांनी दिरंगाई केल्याने आरोपीस लगेच जामीन मिळाला होता. यामुळे शहरवासीयांच्या मनात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी आ. हिरे यांनी विधिमंडळात मंगळवारी (दि.२४) तारांकित प्रश्न उपस्थित केला. रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यास पोलिसांकडून दिरंगाई का करण्यात आली. तसेच संबंधित गुन्ह्याचे दोषारोप पत्र तीन महिन्यांच्या आत न्यायालयासमोर सादर करणे बंधनकारक असतानाही पोलिसांकडून वेळेत का सादर करण्यात आले नाही, असा सवाल करत आ. हिरेंनी अधिवेशनात करत पोलिस प्रशासनाच्या कामकाजातील सावळा गोंधळ उघड केला.
घटनेची सविस्तर चौकशी
सदरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून, रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी हवालदार दीपक पाटील यास निलंबित केल्याची माहिती ना. पंकज भोयर यांनी विधिमंडळात दिली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी अजूनही सुरू असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार असल्याची ग्वाही ना. भोयर यांनी दिली आहे.