City Link Nashik Pudhari file photo
नाशिक

Nashik Citylink | "एका टॅपद्वारे सिटीलिंकचे भाडे अदा करता येणार! कॅशलेस पेमेंटला नाशिक सिटीलिंक संचालक मंडळाची मंजुरी"

Nashik Citylink | कॅशलेस पेमेंटला सिटीलिंक संचालक मंडळाची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिककरांच्या सार्वजनिक वाहतूक प्रवासाला अधिक स्मार्ट आणि डिजिटल स्वरूप देण्याच्या दिशेने सिटीलिंकने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ (सिटीलिंक) संचालक मंडळाच्या ३४ व्या बैठकीत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) आधारित कॅशलेस पेमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना केवळ एका टॅपद्वारे सिटीलिंक बसचे भाडे अदा करता येणार आहे. महापालिका आयुक्त कार्यालयात मंगळवारी (दि. २१) महापौर हिमगौरी आहेर - आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिटीलिंकच्या कामकाजाचा आणि मागील बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

त्याचबरोबर महापौर हिमगौरी आहेर - आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सत्ताधारी पक्षाचे गटनेते श्याम बडोदे आणि विरोधी पक्षाचे गटनेते केशव पोराजे यांची सिटीलिंकच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी नवनियुक्त संचालकांचे स्वागत केले.

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे एनसीएमसी आधारित डिजिटल पेमेंट प्रणालीला मंजुरी. या प्रणालीमुळे प्रवाशांना रोख रक्कम किंवा सुट्ट्या पैशांची गरज भासणार नाही. कार्डला एकच टॅप करून बसचे भाडे भरता येणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत डिजिटल व्यवहारांना अधिक चालना मिळणार आहे.

लेखाजोखा सादर करण्याचे निर्देश

अध्यक्षांनी पुढील बैठकीत सिटीलिंकच्या कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले. विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा करून आवश्यक प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. बैठकीस महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT