Watter Supply Cut Off Pudhari
नाशिक

Nashik Water Cut: नाशिकमध्ये पाणीपुरवठ्याचा दोन दिवसांचा 'शटडाउन'; तारखा, वेळ काय?

Nashik Water Shutdown News | ४-५ एप्रिलला पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार

पुढारी वृत्तसेवा

nashik water cut news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा, स्मार्ट सिटी आणि पाणीपुरवठा यंत्रणेतील अत्यावश्यक दुरुस्ती कामांसाठी नाशिक महापालिकेने ४ व ५ एप्रिल रोजी संपूर्ण शहरात दोन दिवसांचा शटडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत शहरातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून, ६ एप्रिल रोजी सकाळचा पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाइपलाइन दुरुस्ती, गळती बंद करणे, जलकुंभ जोडणी, क्रॉस कनेक्शन, व्हॉल्व्ह बदल व फ्लो मीटर बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सिंहस्थपूर्व कामे आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे ही कामे तातडीने करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पूर्व विभागात कलानगर जलकुंभासाठी ५०० मिमी पाइपलाइनचे ७०० मिमी लाइनशी जोडणी तसेच गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील कामे केली जाणार आहेत. पश्चिम विभागात त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे मोठ्या पाइपलाइनची गळती दुरुस्ती व पी अॅण्ड टी कॉलनीत एअर व्हॉल्व्ह बदलले जाणार आहेत.

नाशिकरोड व गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रांवर ९०० ते १२०० मिमी पाइपलाइनचे क्रॉस कनेक्शन तसेच पंप लाइनवर फ्लो मीटर बसविण्याची कामे होणार आहेत. पंचवटी भागात मखमलाबाद, समर्थनगर परिसरात ऊर्ध्ववाहिनी जोडणी व कुसुमाग्रज गार्डन येथे गळती दुरुस्ती केली जाणार आहे.

सातपूर विभागात १२०० मिमी पीएससी पाइपलाइनवरील अनेक ठिकाणी गळती बंद करण्याची कामे तर नवीन नाशिकमध्ये विविध टाक्यांच्या पाइपलाइन दुरुस्ती, व्हॉल्व्ह बसविणे व क्रॉस कनेक्शनची कामे हाती घेतली जाणार आहेत.

याशिवाय १५ व्या वित्त आयोगातून गंगापूर धरण ते बारा बंगलादरम्यान १८०० मिमी पाइपलाइन प्रकल्पांतर्गत मोठ्या लाइनचे क्रॉस कनेक्शन व हेडवर्क्सवरील जोडणीची कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांचा कालावधी १२ ते ४८ तासांपर्यंत असल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवणे अपरिहार्य असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिककरांनी दोन दिवसांसाठी पाण्याचा साठा करून ठेवावा. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. मनपाच्या कामांना सहकार्य करावे. आपत्कालीन गरजांसाठी पर्यायी व्यवस्था ठेवावी.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा), महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT