सिडको : राजेंद्र शेळके
नाशिकलगत महाराष्ट्र शासनाच्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत १९७५ मध्ये उभारण्यात आलेली सिडको वसाहत आज शहरातील सर्वाधिक मागणी असलेल्या निवासी भागांपैकी एक बनली आहे. सहा योजनांमध्ये विकसित झालेल्या या वसाहतीतील घरांच्या किमती गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या मालमत्तांना आता दीड कोटीचा भाव मिळू लागला आहे.
सिडकोतील प्रमुख रस्त्यांवरील घरांची किंमत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अंतर्गत भागातील घरांची किंमतही किमान २० लाख रुपयांपासून पुढे आहे. शहराचा वाढता विस्तार, चांगली पायाभूत सुविधा, बाजारपेठ, शाळा, रुग्णालये
आणि दळणवळणाच्या सोयीमुळे सिडकोतील मालमत्तांची मागणी सातत्याने वाढत आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या अनेक घरमालकांनी आपल्या घराच्या समोरील भागात दुकाने, कार्यालये किंवा व्यावसायिक आस्थापना सुरू केल्या आहेत.
त्यामुळे या घरांना निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारचे महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी, 'आगे दुकान, पिछे मकान' असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काहींनी पहिला मजला तर काही ठिकाणी दुमजली बांधकाम झाले आहेत. नागरिकांनी समोर व्यवसाय आणि मागील बाजूस वास्तव्यास अशी संकल्पना सिडकोच्या अनेक भागांत रुढ झाली आहे.
घरांच्या वाढत्या किमतीमुळे जुन्या घरांचे नूतनीकरण, पुनर्बाधणी तसेच व्यावसायिक वापराचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी जुन्या घरांच्या जागी आधुनिक इमारती आणि व्यावसायिक संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे सिडकोचा चेहरामोहराही वेगाने बदलत आहे.
एकेकाळी परवडणाऱ्या घरांसाठी ओळखली जाणारी सिडको वसाहत आता नाशिकच्या महत्त्वाच्या रिअल इस्टेट केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. वाढते शहरीकरण, व्यापारीकरण आणि मालमत्तेच्या वाढलेल्या किमतीमुळे सिडकोच्या घरांना दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. येत्या काळातही या भागातील मालमत्तांचे मूल्य आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिडकोच्या घरांचे मूल्यांकन वाढले आहे. सावतानगर, पवननगर ते उत्तमनगर रस्त्यालगत असलेल्या घरांच्या किमती कोटी रुपयांपर्यंत आहे. सिडको प्रशासक कार्यालयाकडून हस्तांतरणासह इतर कामांना विलंब होत असल्याने सिडको कार्यालयात प्रशासकाने दररोज उपस्थिती दाखवावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
- गणेश पवार अध्यक्ष, नागरिक संघटना
सिडको कार्यालयात प्रशासक नियमित येत नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. सिडको प्रशासक आठवड्यातून दोन ते तीन दिवस उपस्थित पाहिजे.
- योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ता