नाशिक : सुषमा गवारे
शहरभरात सोमवारी (दि.९) चॉकलेट डे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेम, आपुलकी आणि मैत्री व्यक्त करण्याचा हा दिवस तरुणाईसह सर्व वयोगटांमध्ये रिसॉर्ट, हॉटेल, गार्डन या ठिकाणी आनंदाने साजरा करण्यात आला.
मित्र-मैत्रिणी, प्रेमीयुगुल तसेच कुटुंबीयांनीही व्यग्र जीवनामध्ये आपल्या जीवलगांसाठी वेळ कातून एकमेकांना चॉकलेट भेट देत भावना व्यक्त केल्या. चॉकलेट डेनिमित्त शहरातील विविध चॉकलेट दुकाने, बेकरी आणि मॉल्समध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.
विविध प्रकारच्या आकर्षक हार्ट शेपमधील चॉकलेट्स, मनाला भावणारे गिफ्ट पॅक्स आणि आकर्षक ऑफर्समुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. चॉकलेट डेमुळे दैनंदिन धावपळीत गोडवा निर्माण केला. अशाही भावना व्यक्त होत होत्या.
व्हॅलेंटाइन आठवड्यातील मंगळवार (दि.१०) टेडी डे आहे. प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानला जाणारा टेडीबेअर या दिवशी खास भेट म्हणून दिला जातो. तरुणाईसह लहान मुलांमध्येही या दिवसाबद्दल विशेष आकर्षण दिसून येते.
शहरातील गिफ्ट शॉप्स, मॉल्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विविध LOVE आकार, रंग आणि संदेश असलेले टेडी बेअर्स उपलब्ध झाले आहेत. 'आय लव्ह यू', 'आय मिस यू' अशा भावना व्यक्त करणारे टेडीबेअर्स खरेदीसाठी मोठी गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून टेडीबेअर्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालेली आहे. टेडी डे हा केवळ प्रेमीयुगुलांपुरता मर्यादित न राहता, मित्र-मैत्रिणी, भावंडे आणि I Love You मुलांना आपुलकी दाखवण्यासाठीही साजरा केला जात आहे.
सोशल मीडियावर टेडीबेअरसह फोटो, शुभेच्छा आणि खास संदेश शेअर करून हा दिवस साजरा करत आहेत. आजचा टेडी डे प्रेम व्यक्त करण्याचा, नात्यांमधील गोडवा वाढवण्याचा आणि आनंद शेअर करण्याचा दिवस म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे.
चॉकलेटमुळे तणाव दूर होतो
मानसोपचार तज्ज्ञांनुसार चॉकलेटमधील घटकांमुळे मेंदूतील 'डोपामाइन', 'सेरोटोनिन' ही रसायने स्त्रवतात. ज्यामुळे आनंद आणि आकर्षणाची भावना वाढते आणि तणावामध्ये चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि नाते फुलण्यास मदत होते.