Nashik Builder Fraud
नाशिक : दोन रो-हाउस सात जणांना विक्री करीत एका बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित राजू सीताराम मानमोठे (रा. वृंदावननगर, म्हसरूळ) याच्याविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
मखमलाबादच्या रामकृष्णनगर परिसरातील रहिवासी पंढरीनाथ चंद्रभान पिंगळे (५५) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मानमोठे याने मे २०२४ पासून गंडा घातला आहे. संशयिताने रो-हाउसच्या मोबदल्यात पिंगळे यांच्याकडून ३० लाख रुपये घेत, ४० लाखांचा जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पिंगळे यांना खरेदी लिहन दिलेले रो-हाउसचे बनावट कागदपत्रे तयार करून भगवंत पाठक यांना खरेदी करून दिले.
त्यानंतर दुसऱ्या रो-हाउसच्या व्यवहारात पिंगळे यांच्या आधी कैलास परदेशी यांना इसार पावती लिहन दिल्याचे आढळून आले. त्यामुळे राजू याने पिंगळे यांची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक एम. एफ. क्षीरसागर हे तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित मानमोठेविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात या आधीही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तसेच पिंगळेंच्या तक्रारीनुसार, राजू याने अजून सात ग्राहकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. दोन रो-हाउस सात ग्राहकांना विक्री करण्याचे सांगत त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा संशय वर्तवला जात आहे. त्यामुळे तक्रारदारांकडून आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली जात आहे.