

नाशिक : २०२१ साली नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली होती. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ होते. प्रकृती ठीक नसल्याने नारळीकर यांचे स्वागत करण्यासाठी भुजबळ थेट पुण्यात गेले होते. भुजबळांनी डॉ. नारळीकरांना चार्टर विमानाने साहित्य संमेलनाला हजेरी लावून भाषण करून, लगेच जावा, अशी विनवणी केली होती. मात्र, नारळीकरांनी भुजबळांचा हा प्रस्ताव नाकारला होता. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने नाशिकशी निगडीत ही आठवणीचे त्यानिमित्त स्मरण केले जात आहे.
९४ व्या अ. भा, साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी व्यासपीठावर एक खुर्ची रिकामी होती. याचे कारण म्हणजे प्रकृती स्थिर नसल्याने संमेलनाध्यक्ष नारळीकर उपस्थित राहू शकले नव्हते. यामुळे भाषण वाचून दाखविले गेले. डॉ. नारळीकर यांनी मंगळवारी (दि.२०) जगाचा निरोप घेतला अन् त्याच दिवशी भुजबळांना मंत्रिपद मिळाले. एकेकाळी नारळीकरांसाठी साहित्यसंमेलनात ठेवलेली रिकामी खुर्ची, भुजबळांसाठी रिकामी झालेली मंत्रिपदाची खुर्ची हा योगायोग फक्त राजकीयच नाही, तर काळाच्या कोपऱ्यातली एक खास नोंद बनून राहिला आहे.
विज्ञान, संशोधन, साहित्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये डॉ. जयंती नारळीकर यांनी भरीव योगदान दिले. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. डॉ. नारळीकर यांचे निधन ही जागतिक विज्ञानविश्वाची मोठी हानी असून, त्यांच्या अकाली जाण्याने देशाने एक प्रेरणादायी शिक्षक आणि विज्ञानप्रसाराचा खंदा शिल्पकार गमावला आहे.
छगन भुजबळ, मंत्री