नाशिक : निखिल रोकडे
महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपांत सहा महिन्यांपासून अटक असलेल्या भोंदू अशोक खरातच्या कथित विकृत कारनाम्यांची धक्कादायक माहिती तपासाच्या अनुषंगाने समोर येत आहे. त्याने महिलांशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवता यावेत, यासाठी पीडित महिलांना गर्भपातास प्रवृत्त करत त्यांना गर्भपातासाठी दिशाभूल केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एखादी महिला गर्भवती झाल्यानंतर खरातकडे गेल्यास तो तिच्या पोटातील गर्भामध्ये दोष असल्याचे सांगत असे. 'तुझ्यामाधील गर्भ पूर्णपणे विकसित नाही', 'गर्भाला एखादा अवयव नाही', 'डोळा नाही', 'हात नाही', 'जन्मानंतर अपत्याला अनेक अडचणी येतील, त्याचा सांभाळ करणे आयुष्यभर कठीण जाईल', अशा स्वरूपाची भीती तो महिलांच्या मनात निर्माण करायचा.
त्यामुळे भविष्यात मोठे दुःख सहन करण्यापेक्षा प्राथमिक अवस्थेतच गर्भपात करावा, असा सल्ला तो देत असल्याचे पुढे आले आहे. याचवेळी गर्भपातानंतर भविष्यात पुन्हा अपत्य जन्माला घालण्यासाठी आपण मदत करू, असे आश्वासनही त्याच्याकडून जात असे. पीडितांच्या मातृत्वाच्या भावनेचा गैरफायदा घेत, मानसिक दबाव निर्माण करून गर्भपातासाठी प्रवृत्त केले जात असे.
आई होणे प्रत्येक महिलेच्या जीवनात अत्यंत भावनिक आणि संवेदनशील बाब असते. मात्र, गर्भधारणेनंतर बाळाच्या आरोग्याबाबत भीती निर्माण झाल्यास आई मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. याच नाजूक अवस्थेचा गैरफायदा घेत तो गर्भात दोष असल्याचे सांगून गर्भपात करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर येत आहे.
हे आरोप खरे ठरल्यास त्याचे कृत्य आजवरच्या त्याच्या काळ्या कृत्यातील अत्यंत गंभीर स्वरूपाचे कृत्य ठरू शकते. गर्भपाताचा निर्णय महिलेच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब असते. अशा निर्णयासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मत, आवश्यक तपासण्या आणि संबंधित महिलेची स्वतंत्र संमती लागते.
मात्र, एखाद्या महिलेच्या मनात चुकीची वैद्यकीय माहिती भरून तिच्या निर्णयक्षमतेवर परिणाम केला गेला असेल, तर हा प्रकार केवळ फसवणुकीचा नसून तिच्या मानसिक स्वातंत्र्यावर आघात आहे. त्यामुळे या प्रकरणात सांगण्यात आलेल्या गर्भातील दोषांची प्रत्यक्ष वैद्यकीय नोंद होती का, संबंधित महिलांनी कोणत्या रुग्णालयात उपचार घेतले आणि गर्भपाताची प्रक्रिया कशी झाली, याची तपासणीही महत्त्वाची ठरणार आहे.
गर्भपातासंदर्भातील हे आरोप तपास यंत्रणांकडून वैद्यकीय कागदपत्रे, संबंधित महिलांचे जबाब आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासले जाने आवश्यक आहे. न्यायालयीन निष्कर्ष येईपर्यंत आरोपांची अंतिम सत्यता निश्चित मानता येणार नाही. मात्र, मातृत्वाच्या स्वप्नालाच कथितपणे लक्ष्य केल्याची माहिती समोर आल्याने 'भोंदू' अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक पैलू आणखी उघड होत असल्याचे चित्र आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी महिलांच्या भावनिक विश्वासाचा वापर करून त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले गेले असेल, तर अशा प्रकारच्या प्रत्येक आरोपाची स्वतंत्रपणे चौकशी होणे गरजेचे आहे. पीडित महिलांनी दिलेली माहिती, त्यांच्या वैद्यकीय नोंदी, उपलब्ध डिजिटल पुरावे तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब या तपासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर आता केवळ लैंगिक शोषणाच्या आरोपांची उकल करण्याचेच नव्हे, तर महिलांना गर्भपातासाठी प्रवृत्त करण्यामागील कथित पद्धतीचा शोध घेण्याचेही आव्हान आहे.