Eco Friendly Ganesha 
नाशिक

Eco Friendly Ganesha  | 40 वर्षांची साधना अन् कपाशीच्या गणपतींची जगभर ख्याती! नाशिकच्या अनंत खैरनार यांची थक्क करणारी कला

Eco Friendly Ganesha  | कपाशीचे शिल्पकार अनंत खैरनार यांची जगभर ख्याती; स्वतंत्र साचा विकसित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंजली राऊत

कापासाच्या नाजूक धाग्यांना कलात्मक आकार देत लाडक्या बाप्पाचे मनोहारी रूप साकारणारे नाशिकचे शिल्पकार अनंत नारायण खैरनार यांनी कलेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून कापूस शिल्पाची साधना करणाऱ्या खैरनार यांनी यंदा साडेसात फूट उंचीच्या 'प्रकृती गणेशा'पासून अवघ्या २५० ग्रॅम वजनाच्या गणेशमूर्तींपर्यंत विविध कलाकृती साकारल्याने नाशिकच्या कपाशीच्या मूर्तिकाराची ख्याती जगभर झाली आहे.

त्यांनी कापूसमूर्तींसाठी आपला स्वतंत्र साचा विकसित केला आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक कापूसशिल्पे त्यांनी साकारली असून, त्यांची कला सुमारे ३० देशांत पोहोचली आहे.
'मातीपासून कापूस, कापसापासून कला आणि कलेतून गणेश' हा अनोखा प्रवास त्यांच्या कलाकृतीतून पाहायला मिळतो. कापूस हा निसर्गाने दिलेला घटक. त्याला मानवी सर्जनशीलतेची जोड देत गणेशाचे रूप देण्याची कला खैरनार यांनी सातत्याने जोपासली आहे.

साडेसात फूट उंचीचा 'प्रकृती गणेश' हा त्यांच्या कलाविष्काराचा विशेष नमुना ठरला आहे. या संकल्पनेत पृथ्वीची प्रतिकृती साकारून त्यावर भारताचे दर्शन घडविले आहे. 'धरती-कापूस-कला-गणेश' अशा संकल्पनेतून निसर्ग आणि भक्तीचा संगम साधला आहे. निसर्गाचे संवर्धन केले, तर त्यालाच देवत्व प्राप्त होते, असा संदेश बाप्पाच्या कलाकृतीतून दिला आहे. या कपाशीच्या मूर्ती यंदा महाराष्ट्रासह हैदराबाद, भोपाळ आणि गोवा येथे पोहोचल्या आहेत.

विसर्जन अन् पुनर्वापर

कापसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी बादलीतही करता येते. विसर्जनानंतर मूर्ती पुन्हा कापसाच्या स्वरूपात येत असल्याने त्याचा पुनर्वापरही शक्य आहे. शिवाय खाण्याचा रंग वापरल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लावण्याबरोबरच कापूस शिल्पकलेचे प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करण्याचाही खैरनार यांचा मानस आहे.


जलप्रदूषण टाळते

खैरनार यांच्या कापूसमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अत्यंत कमी वजन. दीड फूट उंचीची गणेशमूर्ती अवघी २५० ग्रॅम वजनाची आहे. एक ते दीड फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्यासाठी साधारण दोन दिवस लागतात. या मूर्तींना अन्नप्रक्रियेतील रंगांनी रंगवल्याने जलप्रदूषण टाळता येते.

६० दिवसांनी साकारतो बाप्पा

मोठ्या कापूसमूर्ती तयार करण्यासाठी सुमारे ६० दिवसांचा कालावधी लागतो. कापसाला रंग देणे, तो वाळवणे, शरीराचे विविध भाग स्वतंत्रपणे तयार करणे, त्यांना योग्य आकार व मजबुती देणे, संपूर्ण मूर्ती वाळवणे, भावमुद्रा उमटविणे आणि सजावट करणे, अशा अनेक टप्प्यांतून मूर्ती आकाराला येते. कापूस जोडण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर केला जात असून, त्यामुळे मूर्ती हलकी असतानाच टिकाऊ आणि वाहतुकीस सोयीची होते.


शिवलिंगाची प्रतिकृती

कपाशीच्या कलाकृतीमध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची प्रतिकृती दाखवली असून त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे दर्शन घडते. भाविकांना तिन्ही देवतांचे दर्शन व्हावे, यासाठी शिवलिंग फिरते ठेवले आहे. त्यासाठी घड्याळाच्या यंत्रणेचा वापर केला असून, फिरणाऱ्या काट्यावर ठराविक वजनाचा कापसाचा बोळा संतुलित प्रमाण करून ही रचना कार्यान्वित केली आहे. कल्पना सोपी असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आव्हानात्मक असल्याचे खैरनार यांनी सांगितले.

महात्मा गांधींच्या शिल्पाचीही नोंद

खैरनार यांनी महात्मा गांधी यांची साडेसात फूट उंचीचे कापूसशिल्प साकारलेले आहे. या कलाकृतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याचे सांगण्यात येते. लक्झेंबर्ग आर्ट प्राईज, आऊटस्टँडिंग यंग इंडियन आणि इंटरनॅशनल स्कल्पचर सेंटर, अमेरिका आदी संस्थांकडून त्यांच्या कलेची दखल घेतलेली आहे.


१९८७ पासून साधना

नाशिकमधील जव्हार येथे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या खैरनार यांना बालपणापासूनच कलेची आवड होती. रसायनशास्त्राचे पदवीधर असलेल्या खैरनार यांनी एलआयसीतील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पूर्णवेळ कलेला वाहून घेतले. शिल्पकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना त्यांनी १९८७ मध्ये कापसापासून पहिला गणपती साकारला आणि येथूनच त्यांच्या कापूस शिल्पकलेच्या प्रवासाला सुरुवात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT