Nashik APMC Division 
नाशिक

Nashik APMC Division | नाशिक बाजार समितीचे अखेर विभाजन!

Nashik APMC Division | पेठ-त्र्यंबकेश्वरला स्वतंत्र; तिन्हींवर प्रशासक नियुक्त; संचालक मंडळ निष्प्रभावी

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्यात आले आहे. या विभाजनातून आता नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तीन स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आल्या आहेत.

या प्रक्रियेसोबतच नाशिक बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ निष्प्रभावी झाले असून, तिन्ही बाजार समित्यांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी स्वतंत्र प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १३) जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.

याशिवाय नव्याने तयार झालेल्या तिन्ही बाजार समित्यांचा स्वतंत्र कारभार अधिकृतपणे सुरू झाला असून, विभाजनाची अंतिम अधिसूचना निर्गमित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आढावा बैठकीत या विभाजनाचे निर्देश दिले होते.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी सुनील जावळे यांच्या अधिकृत पत्रानुसार आणि १७ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापूर्वी पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी नाशिक बाजार समितीत आणावा लागत होता.

पेठ ते नाशिक अंतर साधारणपणे ५५ ते ५८ किलोमीटर, तर त्र्यंबकेश्वर ते नाशिक अंतर ३० ते ३५ किलोमीटर आहे. या प्रवासामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होता. आता स्वतंत्र बाजार समित्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होईल.

असे आहेत प्रशासक

  • नाशिक बाजार समिती : जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे

  • पेठ बाजार समिती : सहायक निबंधक वैभव मोरडे

  • त्र्यंबकेश्वर बाजार समिती : नाशिक तालुका उपनिबंधक संदीप जाधव

प्रशासकीय भूमिका "विभाजन प्रक्रिया सुरळीत पार पाडणे आणि आगामी निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या हातात बाजार समितीचा कारभार सुपूर्द करणे हाच यामागील मुख्य हेतू आहे. आगामी निवडणुकीनंतर बाजार समितीच्या लोकनियुक्त संचालक मंडळाकडे हा कारभार हस्तांतरित केला जाईल. सध्यातरी केवळ शासन निर्देशानुसार बाजार समितीचे विभक्तीकरण करणे हे आमचे मुख्य कार्य आहे."
कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक तथा प्रशासक बाजार समिती, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT