

कणकवली : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उत्पादित केलेला शेतमाल, बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ तसेच रानभाज्या, मूल्यवर्धीत स्थानिक उत्पादने याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, चांगला दर मिळावा या उद्देशाने पंचायत समिती कणकवली आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर शुक्रवारी स.८ते दु.१ या वेळेत गावठी आठवडा बाजार प. स. कणकवलीच्या जुन्या इमारतीच्या आवारात भरणार आहे. या गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवार, १५ जून रोजी स.९ वा. होणार असल्याची माहिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांनी दिली.
सभापतींच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पं.स.सदस्य गुरू वर्देकर, राजेश जाधव, गुरुनाथ शिंदे, सहायक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, कुळीथ पीठ, विविध मसाले तसेच घरगुती खाद्यपदार्थांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाचे प्रयत्न शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी असून गावठी आठवडा बाजार त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा बाजार दर शुक्रवारी भरविण्यात येणार असून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहील. बाजारासाठी पंचायत समितीच्या जून्या इमारतीच्या आवारात शेडसह आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून जिल्हाभरातील शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, सलग तीन आठवडा बाजारात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास सभापती हर्षदा वाळके यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना एक नवी बाजारपेठ उपलब्ध होणार असून ग्राहकांनाही ताजा व दर्जेदार गावठी माल एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरी जास्तीत जास्त शेतकरी, महिला बचत गट आणि नागरीकांनी या बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती, उपसभापतींनी केले.