Kharif Season 
नाशिक

Nashik Agriculture News | जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग !

Nashik Agriculture News | मका आणि सोयाबीन पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता : ६.४६ लाख हेक्टरवर होणार पेरणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे धडक दिली असली, तरी जिल्ह्यात अद्याप त्याचे आगमन झालेले नाही. मात्र, पावसाची प्रतीक्षा असतानाच जिल्ह्यातील बळीराजा खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला असून, शेती कामांनी वेग घेतला आहे. जिल्हा कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण केले असून, जिल्ह्यात एकूण ६ लाख ४६ हजार ८९९ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निश्चित केले आहे.

यंदाच्या हंगामातही नाशिक जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र सर्वाधिक राहणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तब्बल २ लाख ६३ हजार ७५० हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे. त्याखालोखाल सोयाबीन पिकाचे क्षेत्र १ लाख ९ हजार २०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे, तर पारंपरिक भात पिकासाठी ९४ हजार २३ हेक्टर, बाजरीसाठी ६० हजार ७९८ हेक्टर आणि नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसासाठी ३६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने १ लाख २४ हजार ५५९ क्लिंटल बियाणांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार ६९९ क्विंटल बियाणांचा पुरवठा झाला असून, आतापर्यंत ७ हजार २६५ क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. यामध्ये मका आणि कापूस बियाणांना शेतकऱ्यांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

जिल्ह्यासाठी २ लाख ५३ हजार मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी २ लाख २२ हजार मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. जिल्ह्यात गतवर्षीचा १ लाख १८ हजार ९६८ मेट्रिक टन खत साठा आधीच शिल्लक आहे. मंजूर साठ्यापैकी ३१ हजार ८९२ मेट्रिक टन नवीन साठा प्राप्त झाला असून, आतापर्यंत २९ हजार २१० मेट्रिक टन खतांची विक्री पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात खते आणि बियाणांची कोणतीही चणचण भासणार नाही, अशी तयारी प्रशासनाने केली आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे फक्त मान्सूनच्या पहिल्या दमदार पावसाकडे लागले आहेत, जेणेकरून पेरण्यांना प्रत्यक्ष सुरुवात करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT