नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आडगाव पोलिस ठाणे हद्दीत मे २०२२ मध्ये झालेल्या खूनप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशाल राजाराम कापसे असे दोषी पतीचे नाव आहे. त्याने पत्नी आरती कापसेचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी तीन महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. तर आरोपी क्रमांक दोन ते पाच यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. मांडसांगवी येथे दि. १६ मे २०२२ रोजी रात्री ११ वाजता ही घटना घडली होती. मृत आरती कापसे ही विशाल कापसे याची पत्नी होती.
विशाल कापसे, सुरेश कापसे, निवृत्ती कापसे, शोभा उर्फ अलका कापसे आणि बंटी कापसे यांनी एकत्र येऊन आरती तिच्यासोबत जुन्या भांडणाच्या कारणातून वाद घातला होता. यावेळी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, पती विशालने जवळील पडलेला लाकडी दांडा असलेल्या लोखंडी फावडे आरतीच्या डोक्यात व तोंडावर मारल्याने तिचा मृत्यू झाला होता. या
प्रकरणी आडगाव ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी करत जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल केले होते. २१ सप्टेंबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांनी याबाबत निकाल दिला.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी काम पाहिले. कोर्ट अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयवंत गुळे, पैरवी कर्मचारी संगीता बहिर आणि आडगाव पोलिसांनी पाठपुरावा केला.