Dindori Car Accident News
नाशिक: वाढदिवसाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. दिंडोरी तालुक्यातील वणी-नाशिक रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात दोन वर्षांच्या मुलासह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान घडली. कार एका मोटरसायकलला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटल्याने ७ जणांचा दुर्दैवी अंत झाला.
दिंडोरीतील सारसाळे, कोशिंबे आणि देवठाण येथील तीन कुटुंबे नाशिकमध्ये एका नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपवून रात्री ते अल्टो कारने (MH 04 DY 6642) आपापल्या गावी परतत होते. दिंडोरीतील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर त्यांच्या कारची एका मोटरसायकलशी धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात जाऊन उलटली. कार पाण्यात पूर्णपणे बुडाल्याने आणि दरवाजे लॉक झाल्याने आतील कोणालाही बाहेर पडता आले नाही. त्यामुळे नाका तोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या अपघातात एकाच कुटुंबातील आल्टो गाडीमधील 1) देविदास पंडित गांगुर्डे (वय -28, रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा -नाशिक), मनीषा देविदास गांगुर्डे (वय -23 वर्षे), उत्तम एकनाथ जाधव (वय - 42 वर्षे, रा-कोशिंबे), अल्का उत्तम जाधव (वय - 38 वर्षे, रा. कोशिंबे), दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय - 45 वर्षे, रा. देवपूर), अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय - 40 वर्षे, रा. देवपूर) आणि भावेश देविदास गांगुर्डे (वय - 02 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
या अपघातात मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे (वय २५) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय १८) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.