

नाशिक: समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात सिडको उत्तम नगर येथील एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गेश गोविंद इंगळे (रा. उत्तम नगर, सिडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (दि. १६) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भिवंडीजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश आणि त्याचे तीन मित्र चारचाकी वाहनाने भिवंडीहून नाशिकच्या दिशेने येत होते. समृद्धी महामार्गावरील एका टोलनाक्याजवळ पोहोचले असता, त्यांच्या वेगात असलेल्या कारने पुढे चाललेल्या एका डंपरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात चालक असलेल्या दुर्गेश इंगळे याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
मृत दुर्गेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. त्याच्या या आकस्मिक निधनाने उत्तम नगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.