

Task Force for Prevention of Maternal and Child Mortality
नाशिक : आसिफ सय्यद
राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स अर्थात कृती दल स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. माता, बालमृत्यूशी संबंधित वैद्यकीय तसेच परिस्थितीजन्य कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व नियोजन करण्याकरिता माता व बालमृत्यू अन्वेषणाची जबाबदारी या कृती दलावर असणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बालमृत्यू कमी करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. नवजात अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमात बहुआयामी, पुराव्यावर आधारित धोरणे अवलंबिण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षांत अर्भक आणि पाच वर्षांखालील बालमृत्यूंमध्ये सातत्याने घट दिसून आली आहे. तथापि, राज्यांमध्ये प्रगती एकसारखी नाही. २०११ च्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणासारख्या अलीकडील सर्वेक्षणांवरून राज्यांतर्गत अर्थात जिल्हाअंतर्गत जिल्हा फरकदेखील स्पष्टपणे दिसून येतो.
विशिष्ट भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या यातील नवजात आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मृत्यूदर निर्माण करणारी वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य कारणे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घटनांचा क्रम तपासणे, त्यांच्या नोंदी घेणे आणि या नोंदींवरून अन्वेषण व विश्लेषण करून निष्कर्ष काढणे आणि त्यावर उपाययोजना करणे यातून गरोदरपणात व प्रसूतीदरम्यान द्यावयाच्या सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा तसेच मातांमधील आजारांचे व मृत्यूचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे.
आरोग्य संस्थेमधील व गावपातळीवरील घरी होणाऱ्या मातामृत्यूसाठी आढळून येणाऱ्या विविध कारणांवर उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व नियोजन करण्यासाठी मातामृत्यू अन्वेषण हे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी राज्यातील माता व बालमृत्यू अन्वेषणाकरिता राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्याचा निर्णय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
देशात पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर ३२ आहे. तर महाराष्ट्रात १८ आहे. एवढेच नाही तर देशात बालमृत्यूचे प्रमाण २८ आहे. तर महाराष्ट्रात १८ आहे. देशात सर्वात कमी बालमृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी बालमृत्यू दरात केरळ आघाडीवर आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण प्रतिहजारी जन्मामागे सहा आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत बालमृत्यू दर १२, तर तिसऱ्या क्रमांकावरील तामिळनाडूत हाच दर १३ इतका आहे. राज्याला २०३० पर्यंत बालमृत्यू दर १२ पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्याचा सध्याचा बालमृत्यू दर ११ असल्याने हे उद्दिष्ट आधीच साध्य केले गेले आहे.
देशात एक लाख मुलांच्या जन्मामागे ९७ मातांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. देशात सर्वात कमी १९ मातामृत्यू दर केरळ राज्यात असून, महाराष्ट्रात हाच मृत्यूदर ३३ इतका आहे. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव, संसर्ग, उच्च रक्तदाब, हृदयरोग या प्रमुख कारणांमुळे मातामृत्यू होत असतात. २०२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ९१३ मातामृत्यू झाले आहेत.