देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
नासाकाच्या कर्मचाऱ्यांची तीन कोटी ८४ लाखांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम एका महिन्यात कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याचा दिलेला शब्द भविष्य निर्वाह निधी विभागाचे (प्रॉव्हिडंट फंड) आयुक्त अनिल कोतकर यांनी पाळत अवघ्या पंधरा दिवसांतच संपूर्ण रक्कम कामगारांच्या खात्यात वर्ग केली.
त्यामुळे शेकडो कर्मचारी तसेच मृत कामगारांच्या वारसांना दिलासा मिळाला आहे. पीएफ कार्यालयाचे आयुक्त कोतकर यांची नासाका कामगार युनियनचे पदाधिकारी विष्णुपंत गायखे, नामदेवराव बोराडे, अनिल गायधनी यांनी भेट घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीएफ रकमेचा प्रश्न मांडला होता. त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करत एका महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत संबंधित संस्थांकडून सदरची रक्कम वसूल करत कामगारांच्या खात्यावर त्यांनी वर्ग केली.
नासाका कामगारांना २००४-२००५ पासून पीएफची ३ कोटी ८४ लाख रक्कम पीएफ खात्यात वर्ग होत नसल्याने सेवानिवृत्तीनंतर पीएफ रकम संपूर्णपणे मिळालेली नव्हती. तसेच मिळणारी पेन्शन केवळ नाममात्र होते. पीएफची वाट पाहताना अनेक जण मृत्यूला सामोरे गेले. गत महिन्यात पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
ही बाब आयुक्त कोतकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. पीएफचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कामगार युनियनचे पदाधिकारी विष्णुपंत गायखे, नामदेवराव बोराडे, अनिल गायधनी यांनी पीएफ कार्यालयात जात कोतकर यांच्यासह मोहित दीक्षित, सहायक आयुक्त राजेंद्र खैरनार, अधिकारी जयश्री जोईस, प्रवर्तन अधिकारी शुभम अग्रवाल यांचा सत्कार केला. सदरची रक्कम कारखाना प्रशासनाकडून कामगारनिहाय माहिती आल्यानंतर त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सोसायटीची रक्कम आठ दिवसांत मिळणार
नाशिक सहकारी साखर कारखाना कर्मचारी पतसंस्थेला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तीन कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यापैकी दोन कोटींपर्यंतची रक्कम कामगारांचे समभाग व इतर देणे देण्याकरिता वाटप करण्यात आली. उर्वरित एक कोटीची रक्कम केव्हा मिळणार याकडे कामगारांचे लक्ष लागलेले होते. यास होणारा विलंब लक्षात घेत कामगार नेते भास्करराव गोडसे, विष्णुपंत गायखे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती.
त्यांनी नेमलेल्या लेखापरीक्षकाच्या माध्यमातून रक्कम वाटपाचा निर्णय घेण्यात आला. येत्या आठ दिवसांत कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप केले जाणार आहे. तद्भुतर कामगार प्रश्नांबाबत करावयाचा करारनामा व जिल्हा बँकेवर काढावयाचा मोर्चा याबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भास्करराव गोडसे, विष्णुपंत गायखे, नामदेवराव बोराडे, बबनराव कांगणे, ज्ञानेश्वर गायधनी, मदन गायकवाड आदींनी दिली.