नाशिक : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयावरून मराठा विरूध्द ओबीसी समाजामध्ये वाद पेटलेला असताना याच हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीसाठी बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहे. तर दुसरीकडे या मागणीला आता आदिवासी समाजाकडूनदेखील कडाडून विरोध होत आहे. बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही.
ज्या हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतात पण त्याच्यात तसे कोठेही नाही त्यामुळे त्याची स्पष्टता कुठेही नाही. या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अन्न औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारला दिला आहे.
मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.26) नाशिकमध्ये आदिवासींच्या न्याय हक्क व संविधान संरक्षणासाठी आदिवासींची महापंचायत झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी मंत्री झिरवाळ यांनी संवाद साधला. मंत्री झिरवाळ म्हणाले की, बंजारा समाज कोणत्या अधिकारात आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे, याचा आम्ही अभ्यास केला आहे. यासंर्दभात आम्ही बैठक घेतली, यात समाजातील अनेक तज्ज्ञ लोक सहभागी झाले होते. निवृत्त अधिका-यांनाही याचा अभ्यास केला आहे. बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही. या समाजाला काही ठिकाणी धान्य वाहून नेणारा समाज म्हटले जाते. हैदराबाद गॅझेट इयरचा ते आधार घेत आहे. परंतू, यात तसा कुठेही स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले. संसदेत देखील हा मुद्दा उपस्थितीत झालेला असून तेथे रिजेक्ट झालेला आहे. संविधानाने सांगितले असे कोणी म्हणू शकत नाही. सध्या जिथे जिथे लोन पसरत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. कायदेशीर मार्गाने संसदेत हा विषय मांडला जाईल. आदिवासी होण्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावे लागते असेही मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
जेथे कमी तेथे आपण गेले पाहिजे
बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहे. समाज कमी असतानाही, सर्व समाज एकत्र येऊन मोर्चे काढत आहे. आमच्या मागे कोणीच नाही का ? असा सवाल मंत्री झिरवाळ यांनी उपस्थितीत करत, जेथे कमी तेथे आम्ही जाऊ. आम्ही सगळे एक आहेत, एक तीर एक कमान-सब आदिवासी एक समान आता ती वेळ आली आहे. समाजाने बसून चालणार नसल्याचे मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.