

हिंगोली : जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर एकदाही जिल्ह्याचा दौरा न करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवळांना चौफेर टीकेनंतर उपरती झाली असून आता बुधवारपासून दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येणार असून यावेळी पाचही तालुक्यांत भेट देऊन अतिवृष्टीची पाहणी करणार आहेत. या शिवाय अधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिल्यानंतर गरीब जिल्हा दिल्याने नाराजी व्यक्त केलेल्या पालकमंत्री झिरवळांनी केवळ मागील काही दिवसांत केवळ झेंडा मंत्री म्हणूनच काम केले. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकाही ऑनलाईन घेऊन परस्परच प्रोसिडिंग व मंजूर कामांची यादी पाठवली जाऊ लागली आहे. जिल्ह्याचे प्रश्न प्रलंबित असतानाही तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान होत असतानाही पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला भेट देऊन पाहणी केली नसल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली होती. एवढेच नव्हे तर पालकमंत्री बदलण्याची मागणीही ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे.
या टीकेनंतर आता पालकमंत्र्यांना उपरती झाली आहे. बुधवारपासून पालकमंत्री दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी (दि.17) सकाळी ९ वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते. सकाळी १० वाजता शिवाजीराव देशमुख सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झाल्यानंतर हिंगोली ते नर्सी नामदेव, पुसेगाव, सेनगाव येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान कळमनुरी तालुका, दुपारी ४ ते सायंकाळी ६ औंढा नागनाथ तालुका, सायंकाळी ६.३० वाजता वसमत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित भागाची पाहणी झाल्यानंतर स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्रास भेट दिली.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे गुरुवारी (दि.17) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करतील. सकाळी ११.३० वाजता पक्ष कार्यकर्ते व विविध सहकाऱ्यांशी चर्चा व दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव राहणार आहे. पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे गुरुवारी दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करणार आहेत.