

पुढारी ऑनलाइन डेस्क | महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरुन सुरु असलेली धुसफूस काही कमी होताना दिसत नाही. पालकमंत्रीपदाची घोषणा होऊन 24 तास होत नाही तोच नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. त्यावरुन घटक पक्षांमध्ये वाद सुरु असतानाच राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडवून दिली. 'मी गरीब असल्याने मला गरिब जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले' असे विधान त्यांनी केले.
मंत्री नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. गरिबाला गरीबच जिल्हा का दिला म्हणून त्यांनी खदखद व्यक्त केली. त्यासंदर्भात शासनाला जाब विचारणार असल्याचही ते म्हणाले. त्यांच्या या व्यक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांना विचारले असता, राऊत यांनी झिरवाळांवर जहरी टीका केली आहे. राऊत हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, झिरवाळांना गरीब म्हणणं म्हणजे गौतम अदानींचा अपमान आहे. झिरवाळ हे पूर्वी मोलमजूरी करायचे, विधिमंडळात त्यांच भाषण मी ऐकलयं त्यांनीच तसे सांगितले आहे. परंतु गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, तो खाल्ल्या मिठाला जागतो. याऊलट नरहरी झिरवाळ यांना शरद पवारांनी उंच शिकरावर नेलं. मात्र, त्यांनी शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसला, हे गरिबांचे लक्षण नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान या विधानावरुन नरहरी झिरवाळ यांचे अजित पवारांनी कान टोचले. पालकमंत्री पदावरुन झिरवाळ यांनी केलेले विधान योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. त्यानंतर मात्र झिरवाळ यांनी घूमजाव केले आहे. मी नाराज नाही तर समाधानी आहे. आपण चॅलेंज म्हणून हा जिल्हा स्विकारत असल्याचे झिरवाळांनी म्हटले.
महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपद मिळाले नाही या कारणास्तव काहीजण नाराज आहेत. तर दुसरीकडे ज्यांना मिळालं ते पसंतीचा जिल्हा मिळाला नाही म्हणून नाराज आहेत. असे असताना गरीब जिल्हा म्हणजे नेमकं काय? पालकमंत्री पदावरुन इतकी चढाओढ नेमकी कशासाठी ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने महाराष्ट्राला पडले आहेत. यानिमित्ताने महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरुन असलेली चढाओढ मात्र पुर्ती चव्हाट्यावर आली असल्याचे चित्र आहे.