Nandur Madhmeshwar Sanctuary  
नाशिक

Nandur Madhmeshwar Sanctuary | जागतिक नकाशावरील महाराष्ट्राचा मानबिंदू : नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य

Nandur Madhmeshwar Sanctuary | जागतिक नकाशावर महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेले नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य

पुढारी वृत्तसेवा

निफाड : किशोर सोमवंशी

नांदूरमध्यमेश्वर हे केवळ एक धरण किंवा जलाशय नसून, ती निसर्गाची जिवंत प्रयोगशाळा आहे. निफाड तालुक्यात गोदावरी आणि कादवा संगमावरील हे अभयारण्य पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरले आहे. १९०७ ते १९११ दरम्यान सिंचनासाठी बांधलेल्या दगडी बांधामुळे येथे वर्षानुवर्षे गाळ साचत गेला. परिणामी उथळ पाणथळ जागा, लहान बेटे आणि दलदल निर्माण होऊन ही समृद्ध परिसंस्था विकसित झाली. याचे नैसर्गिक महत्त्व ओळखून १९८६ मध्ये याला 'वन्यजीव अभयारण्य' घोषित केले.

जगातील महत्त्वाच्या पाणथळ जागांना 'रामसर' दर्जा दिला. जातो. नांदूरमध्यमेश्वरमधील ३०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, २४ प्रकारचे मासे, १२ सस्तन प्राणी, ४२ फुलपाखरांच्या प्रजाती आणि ५३५ हून अधिक वनस्पतींच्या प्रजातींमुळे २१ जून २०१९ ला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला. हे मानांकन मिळवणारे राज्यातील पहिलेच स्थळ ठरल्याने भर पडली. नाशिकच्या वैभवात जागतिक स्तरावर रामसर कराराच्या ९ जागतिक निकषांपैकी अनेक निकष हे अभयारण्य पूर्ण करते. येथे नियमितपणे २० हजारांहून अधिक, तर कधीकधी ६० हजारांहून अधिक जलचर पक्षी वास्तव्यास असतात. जे जागतिक जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

नाशिक वन्यजीव विभागामार्फत येथे पाणथळ व्यवस्थापन राबविले जाते. यात जलविज्ञान व्यवस्थापनांतर्गत पक्ष्यांच्या तरंगत्या घरट्यांच्या संरक्षणासाठी पाटबंधारे विभागाशी समन्वय साधत पाणी पातळी राखली जाते. जलपर्णी आणि आयपोमिया यांसारख्या आक्रमक वनस्पतींचा नैसर्गिक पद्धतीने उपसा केला जातो. केवळ जागा असून चालत नाही, तर ती वन्यजिवांसाठी 'राहण्यायोग्य' करण्यासाठी बेटांचे संवर्धन आणि स्थानिक वृक्षांची लागवड केली जाते.

पक्षी कोठून येतात हे अभ्यासण्यासाठी 'रिंगिंग' आणि 'सॅटेलाईट टोंगंग' सारखे प्रयोगही येथे होत आहे. स्थानिक तरुणांना 'इको गाइड' म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. वाढते जागतिक तापमान आणि नदी प्रदूषण नियंत्रणासाठी भविष्यात येथे 'स्वयंचलित हवामान केंद्र' आणि 'संशोधन केंद्र' स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोडक्यात, नांदूरमध्यमेश्वर हे केवळ पर्यटनस्थळ नसून ते निसर्गाचे 'फिल्ट्रेशन युनिट' आहे. ज्याचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी

नांद्रमध्यमेश्वर हे केवळ एक अभयारण्य नसून ती निसर्गाची स्वयंचलित गाळण यंत्रणा आहे. या पाणथळ जागेमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होते. शिवाय हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांना हे हक्काचे घर मिळते. या जागतिक वारशाचे संवर्धन करणे, हे केवळ वनविभागाचे कर्तव्य नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
-हिरालाल चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT