नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना प्रसिध्दीची घटिका समीप आली असताना या प्रभागरचनेत संशयास्पद फेरबदल झाल्याच्या तक्रारींवरून महायुतीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागामार्फत प्रभागरचनेचा आराखडा आयोगाला सादर करण्यात आला असल्याने शिंदे गटाचा प्रभागरचनेवर वरचष्मा असण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तर भाजप आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२१) आयुक्त मनीषा खत्री यांनी तडकाफडकी मंत्रालय गाठल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका निवडणुकांची तयारी राज्य शासन तसेच निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. शासनाने प्रभागरचनेचा कार्यक्रम घोषित केला असून त्यानुसार महापालिकेने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला होता. नगरविकास विभागामार्फत हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असून आयोगामार्फत २२ आॉगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान प्रारूप प्रभागरचना प्रसिध्द केली जाणार आहे. त्यावर हरकती व सूचनांची प्रक्रिया करून ३ ते ६ आॅक्टोबर दरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, नगर विकास विभागाकडे प्रारूप प्रभागरचना सादर केल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे या प्रभागरचनेवर शिंदे गटाचा वरचष्मा राहिल, असे बोलले जाते. अशा परिस्थितीत स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय झाल्यास भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेतृत्वाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, महायुतीत वाद वाढल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2017 नुसार तयार केलेले चार सदस्य प्रभाग कायम ठेवू शकतील, तशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने देखील केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, प्रभागरचनेबाबत तक्रारी झाल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासहप्रमुख अधिकाऱ्यांना तातडीने मंत्रालयात पाचारण करण्यात आले. प्रभाग रचनेत चुका झाल्या असल्यास हरकती व सूचनांच्या प्रक्रियेत दुरुस्ती करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते.