नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मुंबई नाका-गडकरी चौक-त्र्यंबक नाका हा मार्ग आता आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज 'विकास मार्ग' म्हणून विकसित होत आहे. नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागामार्फत या मार्गावरील काँक्रीट रस्ता, भुयारी सुविधा आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेची कामे युद्धपातळीवर सुरू असून, सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहर सज्ञ्जतेला विशेष प्राधान्य दिले जात आहे.
सुमारे १.१४० किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून, त्यासोबतच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध सुविधा एकत्रितपणे उभारल्या जात आहेत. घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायू पुरवठा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत सुमारे ५०० मीटर लांबीची वायू वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय महापालिकेच्या विद्युत यंत्रणांचे स्थलांतर आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे सुमारे ८०५ मीटर लांबीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी १.१४० किलोमीटर लांबीची पावसाळी पाणी निचरा वाहिनी उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक वायू वाहिनी, पावसाळी निचरा वाहिनी आणि काँक्रीट रस्त्याची कामे सध्या वेगाने सुरू असून, नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई नाका, गडकरी चौक आणि त्र्यंबक नाका हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या मार्गाला सर्व आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यास प्राधान्य दिले जात आहे.- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका