Ncmc Card Recharge Pudhari
नाशिक

ST NCMC Card Registration | एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! 'एनसीएमसी' कार्ड नोंदणीचे नियम बदलले; आधार ओटीपीने होणार काम

ST NCMC Card Registration | आता आधार ओटीपीद्वारे नोंदणी; कार्ड हरवल्यास १२९ रुपयांत नवीन कार्ड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी वापरण्यात येणाऱ्या 'एनसीएमसी' कार्डच्या नोंदणी प्रक्रियेत बदल केला आहे. प्रवाशांना कार्ड नोंदणी अधिक सुलभ व्हावी तसेच कार्ड वितरणाची प्रक्रिया गतिमान व्हावी, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार ओटीपीद्वारे नोंदणीची सुविधा दिली आहे.

कार्ड हरवल्यास ते ब्लॉक करून १२९ रुपयांत नवीन 'एनसीएमसी' कार्ड घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड हरवल्यानंतर प्रवाशांना पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच १२ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या प्रवाशांना २५ सप्टेंबरपासून 'एनसीएमसी' कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, १६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना 'एनसीएमसी' कार्ड उपलब्ध होईपर्यंत क्यूआर कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही क्यूआर कोड पावती 'ईटीआयएम' मशीनवर स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड मिळेपर्यंत प्रवासातील सवलतीचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

नोंदणीची क्यूआर कोड पावती ३० दिवसांसाठी वैध राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांना 'एनसीएमसी' कार्डच्या उपलब्धतेनुसार कार्ड मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. नवीन प्रक्रियेमुळे नोंदणीतील अडथळे कमी होण्याबरोबरच प्रवाशांना सवलतीचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाचे बदल

बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण आल्यास आधार ओटीपीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बायोमेट्रिक जुळत नसलेल्या प्रवाशांची नोंदणी रखडणार नाही. तसेच कार्ड हरवल्यानंतर जुन्या कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी ते ब्लॉक करून नवीन कार्ड घेण्याची सुविधा दिली आहे. क्यूआर कोड पावतीमुळे कार्ड मिळण्यास विलंब झाल्यासही संबंधित लाभार्थ्यांना सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे 'एनसीएमसी' कार्डधारक प्रवाशांसाठी नोंदणी, कार्ड वितरण आणि सवलतीचा वापर या तिन्ही बाबी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT