नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र 'गट-क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज करण्यास उमेदवारांना दिलासा देत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आता १० ऑगस्टला रात्री ११.५९ पर्यंत करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्टला रात्री ११.५९ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
एमपीएससीमार्फत यंदा ५,७०७ पदांसाठी 'गट-क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकानुसार विविध विभागांच्या अतिरिक्त मागण्यांचा समावेश करण्यात आल्याने एकूण पदसंख्येत वाढ झाली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
अशा उमेदवारांनी ऑनलाइन प्रणालीतील 'माय अकाउंट' या पर्यायातून आवश्यक असल्यास संबंधित माहिती अद्ययावत करावी. नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करण्यात येणार असून, आवश्यक पात्रता सिद्ध न झाल्यास संबंधित उमेदवारास नियुक्तीस अपात्र ठरवण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
सुधारित शुद्धिपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा-२०२६ रविवारी (दि. ६ सप्टेंबर) घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होईल. पहिला पेपर सकाळी ११ ते १२, तर दुसरा पेपर दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार आहे.
जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्थायी अथवा कायमस्वरूपी निवासाच्या तपशीलानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाइन अर्ज प्रणालीतील उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. १५ जूनला प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील आणि ३० जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकातील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.