नाशिक : दोन दिवसांपासून जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने नदी-नाल्यांना पूरस्थिती उद्भवली असून, शेतपिकांसह अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात भिंत अंगावर पडल्याने सात शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. पातोंडा येथे घरात पाणी पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र श्रावण सरी बरसत असून, बहुतांश भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जळगाव जिल्ह्याला रविवारी (दि.17) रात्री तसेच सोमवारी (दि.18) दिवसभर पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे केळी बागांसह इतर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पशुधन मूत्युूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत रावेर, पाचोरा, बोधवड, गडगाव, जळगाव भागांत पावसाचा चांगलाच तडाखा बसला. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांशी भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. जळगाव, नंदुररबारमध्ये नद्यांनी धोक्याच्या सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात मात्र, श्रावण सरी कोसळत असून अद्याप जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. असे असले तरी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या धरणाच्या पानलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या जिल्ह्यातील 11 धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये दारणा, वालदेवी, आळंदी, भावली, भाम, वाघाड, तिसगांव, करंजवण, गौतमी गोदावरी, नांदुरमध्यमेश्वर यांचा समावेश आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत झालेल्या समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील धरणांत 84 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्याची तयारी केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
धरण - पाणीपातळी ( टक्के)
दारणा- 83.26
मुकणे- 95.18
वाकी-89.69
भाम-100.00
भावली-100.00
वालदेवी-100.00
गंगापूर-84.25
कश्यपी-100.00
गौतमी गोदावरी-100.00
कडवा-82.46
आळंदी-100.00
भोजापूर-81.72
पालखेड-53.45
करंजवण-92.37
ओझरखेड-96.29
वाघाड-100.00
तिसगाव-100.00
पुणेगाव-84.48
नांदूरमध्यमेश्वर-96.50
चणकापूर-69.39