

Heavy rain in Marathwada, many lakes overflow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक भागांतील नदी, नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात कोटबाजार येथे एका घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तसेच किनवट तालुक्यातील एक स्कूलबस पुराच्या पाण्यात वाहून जाऊन चालकाचा मृत्यू झाला. तर जालना तालुक्यातील नागेवाडी येथे भिंत पडून दोन मोटारसायकल व इतर साहित्याचे नुकसान झाले. विभागात अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक छोटे-मोठे प्रकल्प ओवरफ्लो झाले. तर अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले.
मराठवाड्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. चोवीस तासांत सर्व आठही जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक २८ मि.मी. पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सरा-सरी सोळा आणि परभणी जिल्ह्यात १५ मिमी पाऊस झाला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी (७१ मिमी), चौका (१०० मिमी), पिसादेवी (७२ मिमी), वरुड काजी (७२ मिमी) गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा (६५ मिमी), तुर्काबाद (७४ मिमी), डोणगाव (९१ मिमी), वैजापूर तालुक्यात लोणी (११७मिमी), गारज (१२६ मिमी) आणि कन्नड तालुक्यातील देवगाव (८६ मिमी) अतिवृष्टी झाली आहे.