विश्रांती घैतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्याला दि. २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांचा रेड अलर्ट देण्यात आला आहे (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Monsoon Return Journey: पुन्हा धो धो ! नाशिकला तीन दिवसांचा ‘रेड अलर्ट’

वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : परतीचा पाऊस नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकुळ घालत आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्याला दि. २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील बहुतांश भागाला परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीपासून नाशिक जिल्हाही अपवाद राहिलेला नाही. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. आता पुन्हा एकदा रेड अलर्ट दिल्याने, बळीराजा धास्तावला आहे. हवामान विभागाने यापूर्वीच नाशिकला २६ ते २९ पर्यंत आॅरेंज अलर्ट दिला होता. मात्र, आता २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. २८ सप्टेंबरच्या सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकसह मराठ्यावाड्यातील नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव तसेच जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. याशिवाय विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही परतीच्या पावसाने झोडपले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, दारणा, मुकणे, वाकी, कडवा या धरणांसह नांदुरमध्यमेश्वर व उन्नैयी बंधारा आदी पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागणार आहे. तसेच भावली, भाम, वालदेवी, आळंदी, भोजापूर व इतर ३४ लघु प्रकल्प देखील १०० टक्के भरलेले असल्याने, सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील गावांनी नदीकाठी असलेले साहित्य अथवा जनावरे तत्काळ हलवावीत, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या जिल्हा सहाय्यक पूर समन्वयक तथा कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

‘गंगापूर’मधून विसर्ग वाढविला

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने, शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता धरणातून ११०६ क्यूसेक वेगाने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धरणातून एकुण १६५९ क्यूसेक वेगाने पाणी बाहेर पडत असून, गोदावरीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पातून होत असलेला विसर्ग

  • गंगापूर - १६५९

  • दारणा - ४००

  • वालदेवी - ६२

  • आळंदी - २४३

  • भावली - १३५

  • भाम - ३३१

  • वाघाड - ६५०

  • पालखेड - ८६६

  • करंजवण - ४५१

  • कादवा - ४१५

  • तीसगाव - ६८

  • गौतमी गोदावरी - १४४

  • कश्यपी - १६०

  • ओझरखेड - १५६

  • पुणेगाव - १५०

  • नांदूरमध्यमेश्वर - ३१५५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT