

निफाड ( नाशिक ) : निफाड परिसरातील रामपूर, सोनेवाडी, श्रीरामनगर, थेटाळे आदी भागांत ढगफुटीसद़ृश पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. कांदा चाळींमध्ये साठवलेला कांदाही भिजला असून टोमॅटो, लाल कांदा रोपे, सोयाबीन, सिमला मिरची, मका यासह इतर पिकांनाही पावसाचा चांगलाच फटका बसला.
शेत- शिवारातील पाणी रस्त्यावर आल्यामुळे शिवरे फाट्याजवळील नाशिक- संभाजीनगर महामार्गावर दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. नाला बुजल्यामुळे पाणी महामार्गावर साचले होते. अखेरीस वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बनकर यांनी प्रभावित गावांना भेट देऊन शेतकर्यांची विचारपूस केली तसेच पिकांचे नुकसान पाहिले. शेतकर्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अवकाळीने सुरू झालेला पाऊस परतीच्या प्रवासातही धुवाधार बरसत असल्याने, शेतीपिकांसह शहरी भागातील छोटे-मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. दोन दिवसांपासून परतीच्या पावसाची झड लागली आहे. मंगळवारी (दि. 23) दिवसभर सरींवर सरी कोसळल्याने, जागोजागी पाणी साचले. धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी, गोदावरीला पूरस्थिती झाल्याने, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचा प्रवास
15 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा प्रवास असेल, असे हवामान खात्याने अगोदरच स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांचा विचार केल्यास, पाऊस एक दोन दिवसांची उसंत घेत होता. मात्र, मागील तीन दिवसांपासून संततधार लागल्याने, सर्वत्र दाणादाण उडाली आहे. रात्रीच्या सुमारास धुवाधार पाऊस होत आहे. परिणामी, पाण्याचा निचरा न होऊन सखल भाग तळ्यात रूपांतरित झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास तब्बल 47.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या काही तासांतच हा पाऊस बरसला. ऐन पावसाळ्यात देखील कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली नसल्याने, परतीचा पाऊस अक्षरश: कहर करीत आहे.
सर्वच धरणातून विसर्ग वाढविला
पाणलोट क्षेत्रातील नदी-नाल्या दुथडी भरून वाहत असल्याने अगोदरच काठोकाठ भरलेल्या धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. 16 प्रकल्पांतून बाहेर पडणारे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधारामार्गे जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे. या बंधार्यातून सायंकाळी 6 वाजता 6310 ने वाढ करून 15 हजार 775 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.