चांदवड (नाशिक) : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. यात काढणीला आलेला मका, सोयाबीन, तर लागवड केलेले कांदा, द्राक्ष, टोमॅटो पीक पूर्णपणे खराब झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आठ दिवसांपासून परतीच्या पाऊस दररोज जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे खरिपातील मका, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तसेच कांदा, द्राक्ष पिकांवर करपा, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. राजदेरवाडी, नांदूरटेक, वडबारे, शेलू, पुरी, कानमंडाळे, राहूड, उसवाड, कळमदरे, डोंगरगाव, दरेगाव, निमोण आदींसह बहुतेक गावांतील कांदा पीक खराब झाले आहे. अर्ली द्राक्ष बागांची शेतकऱ्यांनी छाटणी केली आहे. मात्र, पावसामुळे द्राक्ष बागांवर बुरशी, करपाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालवी फुटत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
तालुक्यातील राजदेरवाडी, नांदूरटेक, वडबारे, राहूड गावांत शनिवारी (दि.२०) दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वडबारे येथील पांगळी नदीला पूर येऊन राहूड धरणात पाण्याचा प्रचंड जोर वाढला. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह वाहत होता. त्यात राहूड धरण क्षेत्रातील व गावातील शेतकऱ्यांचे मका, कांद्याचे शेत वाहून गेले आहे.
पीक गेले वाहून
वडबारे येथील पांगळी नदीला प्रचंड पूर आल्याने या पुरात अक्षय खंडेराव जाधव या शेतकऱ्याची गाय वाहून गेली, तर नदीपात्र परिसरातील शेतकरी खंडू जाधव, शहाजी जाधव, संजय जाधव, नरहरी जाधव आदींचे कांदा, मका, सोयाबीन पीक वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे नांदूरटेक, राहूड येथील शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले.
मागील वर्षीदेखील अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. आता कसेबसे सावरत असताना पुन्हा परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्य सरकारने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी.
नामदेव पवार, शेतकरी, राहूड.
वडबारे येथील एका शेतकऱ्याची गाय मयत झाली आहे. पावसामुळे राहूड धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित ग्राममहसूल अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंदार कुलकर्णी, तहसीलदार.